उत्तर मुंबईत कॉंग्रेस-भाजप कार्यकर्ते भिडले!

मुंबई – उत्तर मुंबईल लोकसभा मतदारसंघातील कॉंग्रेसच्या उमेदवार उर्मिला मातोंडकर यांच्यासमोरच कॉंग्रेस आणि भाजपचे कार्यकर्ते आपआपसात भिडले. हा प्रकार पश्‍चिम रेल्वेमार्गावरील बोरीवली स्थानकाबाहेर घडला. पण पोलिसांच्या मध्यस्थीनंतर वाद निवळला.

उर्मिल मातोंडकर या उत्तर मुंबई मतदारसंघात जोरदार प्रचार करत आहेत. सकाळी उर्मिला मातोंडकर या बोरीवली स्थानकाबाहेर प्रचारासाठी गेल्या होत्या. मात्र, तिथे आधीच भाजपचे कार्यकर्ते जमले होते. ज्यावेळी उर्मिला मातोंडकर या बोरीवली रेल्वे स्थानकाबाहेर पोहोचल्या, त्यावेळी भाजपच्या कार्यकर्त्यांनी “मोदी..मोदी’ अशा घोषणा देण्यास सुरुवात केली. उर्मिला मातोंडकर यांचा प्रचार बोरीवली रेल्वे स्थानाकाबाहेर नियोजित होता. त्या येणार असल्याचे कळताच भाजप कार्यकर्ते तिथे पोहोचले आणि त्यांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली.

त्यावेळी, कॉंग्रेस कार्यकर्त्यांनीही “चौकीदार चोर है’च्या घोषणा दिल्या. दोन्हीकडून घोषणाबाजी सुरु झाली आणि त्याचा परिणाम धक्काबुक्कीत झाला. शेवटी परिसरात एकच गोंधळ उडाला. प्रसंग हाणामारीपर्यंत आला.दरम्यान, पोलिसांनी वेळीच मध्यस्थी केल्याने कॉंग्रेस आणि भाजप कार्यकर्त्यांमधील वाद निवळला.

याप्रकरणी उर्मिला मातोंडकर म्हणाल्या की, मी परवानगी घेऊन बोरिवलीत रॅलीचे आयोजन केले होते. माझी रॅली बोरिवली स्थानकाजवळ आली तेव्हा 10-12 गुंड मोदी-मोदी’ अशा घोषणा देत होते. या कार्यकर्त्यांनी आमच्या महिला कार्यकर्त्यांना धक्काबुक्की केली. तसेच ते लोक अश्‍लील हावभाव करत होते. त्यानंतर काही कार्यकर्त्यांनी या गुंडांना मारहाण केली. याप्रकरणी मी पोलिसात तक्रार केली आहे. तसेच इथून पुढे मला प्रचारादरम्यान संरक्षण देण्याची मागणीदेखील केली आहे. तसेच या प्रकरणी घोषणा देणा-यांना मारहाण केल्याची तक्रार भाजपच्या स्थानिक पदाधिकारी यांनी केली आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.