काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे सर्व मुद्द्यांवर एकमत

नवी दिल्ली: महाराष्ट्रातील सत्तास्थापनेचा पेच आता सुटताना दिसत आहे. महाराष्ट्रामध्ये पर्यायी सरकार बनवण्याच्या दृष्टीने काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस यांची दुसरी महत्त्वपूर्ण बैठक आज नवी दिल्लीत पार पडली. शुक्रवारपर्यंत अंतिम निर्णय येणार असल्याची माहिती आहे.

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची चर्चा पूर्ण झाली असून सर्व मुद्द्यांवर एकमत झाले असून उद्या दोन्ही पक्षांचे नेते मुंबईला जाऊन महाआघाडीतील इतर मित्रपक्षांशी चर्चा करतील व आतापर्यंत झालेल्या घडामोडींची माहिती देतील. तसेच मित्रपक्षांशी बोलणी झाल्यानंतर शिवसेनेशी चर्चा करणार असल्याची माहिती काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी दिली.

यापूर्वी बुधवारी झालेल्या बैठकीनंतर शिवसेना नेते संजय राऊत म्हणाले की, येत्या 2 ते 5 दिवसांत सर्व प्रक्रिया पूर्ण केली जाईल.  जेव्हा 3 पक्ष सरकार बनवतात तेव्हा प्रक्रिया लांब असते. आजपासून ही प्रक्रिया सुरू झाली आहे. येत्या 2-5 दिवसांत प्रक्रिया पूर्ण झाल्यावर महाराष्ट्रात सरकार स्थापन होईल. तसेच शिवसेनेने मुख्यमंत्री व्हावे, ही महाराष्ट्रातील जनतेची इच्छा आहे. आणि उद्धव ठाकरे यांनी नेतृत्व केले पाहिजे ही राज्याची भावना असल्याचे राऊत म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.