मुंबई – ६८ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा शुक्रवारी दिल्लीतील नॅशनल मीडिया सेंटर येथे करण्यात आली. सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन, सर्वोत्कृष्ट चित्रपट या पुरस्कारांबरोबरच सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार ‘सुराराई पोट्रु’साठी अभिनेता सूर्या आणि ‘तान्हाजी : द अनसंग वॉरियर’ या चित्रपटासाठी अभिनेता अजय देवगण यांना विभागून देण्यात आला.
तान्हाजी हा सिनेमा १० जानेवारी २०२० रोजी प्रदर्शित झाला होता.थिएटर्समध्ये देखील प्रेक्षकांनी या सिनेमाला चांगला प्रतिसाद दिला होता. छत्रपती शिवाजी महारांचा मावळा असलेल्या तान्हाजी मालुसरेची ही कहाणी होती. यामध्ये अभिनेता अजय देवगणने तान्हाजींची भूमिका केली होती तर अभिनेता सैफ अली खान खलनायक उदयभान राठोडच्या भूमिकेत दिसला होता.
मराठी कथा आणि मराठी दिग्दर्शक
तान्हाजी द अनसंग वॉरिअर या चित्रपटाचे दिग्दर्शन ओम राऊत यांनी केलं होत. विशेष म्हणजे या चित्रपटात अनेक मराठी कलाकारही दिसले होते, अजय-अतुल या सुप्रसिद्ध जोडीनं या चित्रपटाला म्युजिक दिल होत. देशभरात अनेक थिएटर्समध्ये हाऊसफुलचे बोर्ड झळकवत तान्हाजी चित्रपटाने तब्बल ३५० कोटींहून अधिक कमाई केली होती.
अभिनंदनाचा वर्षाव
तान्हाजी चित्रपटाला ३ पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. बेस्ट पॉप्युलर फिल्म, बेस्ट ऍक्टर आणि बेस्ट कॉश्यूम या तीनही कॅटेगरीमध्ये चित्रपटाने बाजी मारली. त्यानंतर चित्रपटाच्या दिग्दर्शकासह निर्मात्यांवर अभिनंदनाचा वर्षाव होताना पाहायला मिळाला. अभिनेत्री काजोलने ट्विट करत दिग्दर्शकासह संपूर्ण टीमचे अभिनंदन केले आहे. त्यासोबतच मनोरंजन क्षेत्रातून अनेकांनी चित्रपटावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.
Team Tanhaji wins 3 national awards. So happy and proud !
Best Actor @ajaydevgn
Best Popular film providing Wholesome Entertainment @omraut
Best Costume @nachiketbarve#TanhajiTheUnsungWarrior pic.twitter.com/9qqurVtant— Kajol (@itsKajolD) July 22, 2022
अभिनेता अजय देवगनला या आधी दोन वेळा उत्कृष्ट अभिनेता म्हणून राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. १९९८ मध्ये जख्म साठी आणि २००२ मध्ये द लेजेंड ऑफ भगत सिंह या चित्रपटासाठी अजयने राष्ट्रीय पुरस्कार पटकावले आहेत.