स्वातंत्र्यदिनी विद्यार्थ्यांना “विमा कवच’ : प्रभातफेरी, सामाजिक संदेश, गुणवंतांचा सन्मान
मावळ (ठिकठिकाणच्या वार्ताहरांकडून) – देशभक्तीपर गीते, सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान, विशेष प्राविण्य मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा पाठिवर शाबासकीची थाप, प्रभातफेरीतून सामाजिक संदेश, माजी विद्यार्थ्यांची भेट, विशेष म्हणजे स्वातंत्र्यदिनी विद्यार्थ्यांना विमा संरक्षणाची अनोखी भेट, यांसह कोल्हापूर-सांगलीमधील पूरामध्ये मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना श्रद्धांजली वाहत मावळ तालुक्यात स्वातंत्र्यदिन उत्साहात करण्यात आला. शाळा, महाविद्यालय, शासकीय कार्यालये, ग्रामपंचायत कार्यालयामध्ये ध्वजारोहण करण्यात आले.
विद्यार्थ्यांचा ग्रामस्थांकडून सन्मान
इंदोरी – येथे स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला. स्वातंत्रदिनाचे औचित्य साधून गावातील गुणवंत विद्यार्थी तसेच सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचा सत्कार करण्यात आला. तसेच प्रगती विद्या मंदिर शाळेतील दहावीमध्ये विशेष प्रावीण्य मिळवलेल्या तीन विद्यार्थ्यांचा सत्कार ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आला. इंदोरी गावच्या सरपंच किर्ती पडवळ यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या वेळी इंदोरी ग्रामस्थ, विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचालन रूपेश शिंदे यांनी केले. उपसरपंच दिनेश चव्हाण यांनी आभार मानले.
नाणे मावळात प्रभात फेरीतून सामाजिक संदेश
नाणे मावळ – ग्रामीण भागात स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला. विविध गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, ग्रामपंचायत कार्यालय माध्यमिक विद्यालय, महाविद्यालय, कामशेत शासकीय आरोग्य केंद्र, पोलीस ठाण्यात ध्वजारोहण करण्यात आली. नाणे मावळातील कांबरे येथे सरपंच भाऊसाहेब दाभणे, कोंडीवडे येथे शालेय समितीचे अध्यक्ष तानाजी दाभणे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. करंजगावच्या गोल्डन ग्लेड्स माध्यमिक विद्यालयात संस्थेचे संस्थापक शिवाजीराव टाकवे, प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका अरुणा सोनवणे, ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच उर्मिला रवी शेलार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. करंजगाव येथे सामाजिक संदेश देण्याच्या उद्देशाने प्रभातफेरी आयोजित करण्यात आली होती. गोवित्री येथे ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच भारती संतोष पानगले यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. गोल्डन ग्लेड्स माध्यमिक विद्यालयात सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित न करता सांगली-कोल्हापूर येथील पूरग्रस्तांतील मृतांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
सांगिसे येथील उषाताई लोखंडे माध्यमिक विद्यालयात सुनीता वंजारी आणि ग्रामपंचायत कार्यालयातीच्या ध्वज ज्ञानेश्वर भांगरे यांनी फडकविला. याशिवाय नाणे येथील नाणे माध्यमिक विद्यालयात नाणे गावच्या उपसरपंच कटके यांनी, तर ग्रामपंचायत कार्यालयाचे ध्वजारोहण सरपंच मारुती शेटे यांच्या हस्ते करण्यात आले.
कृष्णराव भेगडे शाळेकडून पूरग्रस्तांना मदत
तळेगाव दाभाडे – तळेगाव विद्या प्रतिष्ठान संचलित, कृष्णराव भेगडे इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला. राजमाता जिजाऊ महिला मंचच्या अध्यक्षा सारिका भेगडे, लायन्स क्लब ऑफ तळेगाव दाभाडेचे अध्यक्ष श्रीराम कुबेर, मामासाहेब खांडगे स्कूलचे अध्यक्ष गणेश खांडगे, संस्थेचे संस्थापक चंद्रकांत काकडे, संस्थेचे अध्यक्ष संदीप काकडे, शाळेचे अध्यक्ष डॉ. दिलीप भोगे, संस्थेच्या सचिव राजश्री म्हस्के, संस्थेच्या खजिनदार गौरी काकडे, मंगलाताई काकडे व मान्यवर उपस्थित होते. प्रास्ताविक शाळेच्या मुख्याध्यापिका मीना अय्यर यांनी केले. संदीप काकडे आणि शाळेच्या मुख्याध्यापिका मीना अय्यर यांनी केला. अनुष्का शिरसाट, समर्थ ढोरे, उत्सव ठाकूर यांनी भाषण केले. शिक्षिका सोनाली पाटील, कांचन पेठकर यांनी स्वातंत्र्य दिन आणि रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या. डॉ. दिलीप भोगे यांनीही सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या. संस्थेच्या वतीने 51 हजार रुपयांचा मदत पूरग्रस्तांना जाहीर केली. तसेच शाळेच्या शिक्षकांचा एक दिवसाचा पगारही मदत म्हणून देण्याचे आश्वासन दिले. सूत्रसंचालन शताब्दी गुप्ता यांनी केले. संदीप काकडे यांनी आभार मानले.
विद्यार्थ्यांना विमा संरक्षणाची अनोखी भेट
कामशेत – येथील श्री आनंदराम पन्नालाल भटेवरा जैन इंग्लिश स्कूलमध्ये स्वातंत्रदिन उत्साहात साजरा करण्यात आला. ध्वजारोहणानंतर शाळेतील पहिली ते आठवी वर्गातील विद्यार्थ्यांमध्ये देशभक्तीपर समूहगीतांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचे पंच म्हणून गणेश घोगरे व संध्या कुलकर्णी यांनी काम पहिले. स्वातंत्रदिनी शाळेकडून शाळेतील 828 विद्यार्थ्यांचे विमा संरक्षण कार्डचे वाटप करण्यात आले. शालेय विद्यार्थी आजारी पडून त्यांना वेळेवर योग्य ते उपचार न मिळाल्यास त्यांचे शैक्षणिक व आर्थिक नुकसान होते. हे टाळण्यासाठी आम्ही हा विमा उतरविण्याचा उपक्रम घेतला असल्याचे शाळेचे विश्वस्त सुनील भटेवरा यांनी सांगितले. कार्यक्रमाचे संयोजन मुख्यध्यापिका तनुश्री शर्मा यांनी केले होते.
माजी विद्यार्थ्यांची अनोखी भेट
नाणे मावळ – कामशेतमधील पंडित नेहरू विद्यालयातील माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येत महर्षी कर्वे विद्यालय, आश्रम शाळा व एकता निराधार संघ येथे विद्यार्थांना खाऊ वाटप केले. या वेळी शाळेचे प्राचार्य देवरे, अध्यक्ष सचिन लोंढे, शिक्षक वृंद तसेच पंडित नेहरू विद्यालयाच्या 2010 च्या बॅंचचे विद्यार्थी उपस्थित होते. माजी विद्यार्थी यांनी एकत्र येऊन हा उपक्रम राबवला होता.
कान्हे गावात विद्यार्थ्यांना वृक्षाचे वाटप
नाणे मावळ – कान्हे गावातील तरुणांनी रक्षाबंधन आणि स्वातंत्रदिनाचे औचित्य साधून आपण निसर्गाचे व समाजाचे काहीतरी देणं लागतो या भावनेतून वृक्ष वाटपाचा उपक्रम गौरवास्पद आहे. कान्हे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, छत्रपती शिवाजी महाराज हायस्कूल व कॉलेज या ठिकाणी शशांक गुलाबराव सातकर व तुषार आदिकराव सातकर यांच्या संकल्पनेतून व सहकार्यातून झाडे (रोप) वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला. जीवनातील अनावश्यक खर्चांना फाटा देऊन या तरुणांनी सुमारे पाचशे रोपांचे वाटप केले. यामध्ये कडुलिंब, वड, पिंपळ, उंबर व गुलमोहर या रोपांचे वाटप करण्यात आले. रक्षाबंधनाच्या दिवशी भावांनी दिलेल्या झाड रुपी भेटीचा वृक्ष संवर्धन करून उपक्रम सार्थकी लावण्याचे आवाहन त्यांनी केले. या वेळी कान्हे गावच्या सरपंच पूनम सातकर, उपसरपंच सतीश सातकर, सदस्य किशोर सातकर, राजेंद्र सातकर, अभिजित सातकर, माजी उपसरपंच दिनकर सातकर, मदन शेडगे, लक्ष्मण सातकर, शरद सातकर, सचिन सातकर, अभिजित सातकर, रामदास सातकर, शालेय समिती अध्यक्ष विजय शेडगे, समीर सातकर, प्रतीक सातकर, भूषण सातकर, धीरज सातकर, मुख्याध्यापक बनसोडे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.