पटना – बिहारमध्ये एनडीए आघाडीला बहुमत मिळाल्यानंतर आज नितीश कुमार यांचा शपथविधी सोहळा पार पडला. ही त्यांच्या राजकीय कारकिर्दीतील मुख्यमंत्रीपदाची सातवी शपथ ठरली आहे. नव्या मंत्रिमंडळात भाजपचे तारकिशोर प्रसाद आणि रेणू यादव उपमुख्यमंत्रीपदाची धुरा सांभाळणार आहेत. या दोन्ही नेत्यांनी देखील आज मंत्रिपदाची शपथ घेतली. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजप अध्यक्ष जे पी नड्डा यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या सोहळ्यात एकूण १४ मंत्र्यांचा शपथविधी पार पडला.
नितीश कुमारांच्या नव्या मंत्रिमंडळात कोणाला संधी? वाचा संपूर्ण यादी
दरम्यान, बिहार विधानसभा निवडणुकांमध्ये नितीश कुमार यांच्यावर सडकून टीका करणारे लोजपचे अध्यक्ष चिराग पासवान यांनी नितीश कुमारांच्या शपथविधीनंतर त्यांना पुन्हा एकदा टोला लगावला आहे.
पासवान यांनी कुमार यांच्या शपथविधीनंतर आपल्या अधिकृत ट्विटर खात्यावर एक शुभेच्छा संदेश पोस्ट केला आहे. मात्र शुभेच्छा देताना त्यांनी, ‘मुख्यमंत्रीपदी निवड झाल्याबाबत आदरणीय नितीश कुमार यांना शुभेच्छा. अपेक्षा व्यक्त करतो की, हे सरकार आपला पाच वर्षांचा कालावधी पूर्ण करेल व तुम्ही एनडीएचे मुख्यमंत्री म्हणूनच पदावर कायम रहाल.’ असा उपरोधिक टोला देखील लगावला आहे.
आदरणीय @NitishKumar जी को फिर से मुख्यमंत्री बनने की बधाई। आशा करता हूँ सरकार अपना कार्यकाल पुरा करेगी और आप एन॰डी॰ए॰ के ही मुख्यमंत्री बने रहेंगे।
— युवा बिहारी चिराग पासवान (@iChiragPaswan) November 16, 2020
याबाबत केलेल्या एका अन्य ट्विटमध्ये त्यांनी आपल्या नितीश कुमार यांना बिहारच्या प्रगतीसाठी आपल्या पक्षाच्या जाहीरनाम्यात नमूद मुद्द्यांवर काम करण्याचा सल्ला दिला. मात्र या यात देखील त्यांनी, ‘आपण मुख्यमंत्री झाल्याबाबत व भाजपने आपल्याला मुख्यमंत्री केल्याबाबत दोघांचेही अभिनंदन’ असा टोला लगावत नितीश कुमार हे भाजपच्या जोरावर मुख्यमंत्री बनल्याचं दर्शवलं.
4 लाख बिहारीयों द्वारा बनाया गया #बिहार1stबिहारी1st विजन डॉक्यूमेंट आप को भेज रहा हूँ ताकी उसमें से भी जो कार्य आप पुरा कर सकें वह कर दें। एक बार पुनः आप को मुख्यमंत्री बनने की और भारतीय जनता पार्टी को आप को मुख्यमंत्री बनाने के लिए बधाई।https://t.co/kZvjg56fRZ
— युवा बिहारी चिराग पासवान (@iChiragPaswan) November 16, 2020