यशासाठी नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन – राहुल गांधी

कॉंग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकत्र्यांना खचून न जाण्याचा सल्ला

नवी दिल्ली (प्रतिनिधी) – भारतवासीयांनी देशाची धुरा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हाती दिली देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचा आम्ही आदर करतो आणि या यशासाठी नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन करतो, अशी प्रतिक्रिया कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज पक्षाच्या मुख्यालयात दिली.

अकबर रोडवरील मुख्यालयात पत्रकारांशी बोलताना कॉंग्रेस अध्यक्ष म्हणाले की, भारताची जनता मालक आहे आणि या जनतेने आज आपला निकाल दिला आहे. या जनादेशाला मला कोणताही वेगळा रंग द्यायचा नाही. लोकांना वाटते की मोदी यांनी पुन्हा देशाची धुरा सांभाळावी. या मताचा मी आदर करतो’.

लोकसभेच्या निवडणुकीत कॉंग्रेसला जोरदार फटका बसला आहे. जवळपास 23 राज्यांमध्ये कॉंग्रेसला एकही जागा मिळाली नाही. एवढेच नव्हे तर, पारंपारिक सीट अमेठी सुध्दा कॉंग्रेसला राखता आली नाही.

राहुल गांधी म्हणाले की, नरेंद्र मोदी आणि कॉंग्रेस वेगळ्या विचारधारेचे पक्ष आहेत. या निवडणुकीत मोदी जिंकले आहेत. परंतु, जीवाची बाजी लावून 17 व्या लोकसभेची निवडणूक लढविणाऱ्या कॉंग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी भाजपच्या विजयामुळे घाबरून जावू नये. आपण एकजुटीने भाजपच्या विचारधारेचा सामना करू आणि कॉंग्रेसच्या विचारधारेला विजयी करू’, असा संदेशही राहुल गांधी यांनी दिला. कॉंग्रेसच्या कार्यकारणीची लवकरच बैठक बोलाविण्यात येणार असून त्यात पराभवाचा आणि आगामी रणनितीवर विचार विनिमय केला जाणार आहे.

उत्तर प्रदेशमधील अमेठी लोकसभा मतदारसंघाच्या निकालाबाबत राहुल यांना विचारले असता ते म्हणाले, अमेठीत स्मृती इराणी जिंकल्या आहेत. मी त्यांचे अभिनंदन करतो आणि जनतेचा कौल स्वीकारतो. स्मृती इराणी प्रेमाने अमेठीच्या जनतेला सांभाळतील अशी मी त्यांच्याकडून अपेक्षा करतो.

मला कितीही शिव्या दिल्या तरी मी प्रेमाने बोलणार, ते माझं तत्वज्ञान आहे. प्रेम कधी हरत नाही. मात्र आज नवे पंतप्रधान निवडण्याचा दिवस आहे, तर मी त्याविषयीच बोलेन,’ असेही ते म्हणाले. खरं सांगायचं तर आज मला काय वाटतं, कुठे चुकलं वगैरे चर्चा करण्याचा दिवस नाही. कारण भारताच्या नागरिकांनी नरेंद्र मोदींना स्पष्ट कौल दिला आहे. मोदी त्यांचे पंतप्रधान होणार आहेत आणि एक भारतीय म्हणून मी याचा आदर करतो, असे त्यांनी स्पष्ट केले.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×