सांगली जिल्ह्यात काँग्रेस पक्षाला खिंडार

सांगली – माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेसचे नेते प्रतिक पाटील यांनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला आहे. प्रतिक पाटील यांच्या या निर्णयामुळे काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसला असून जिल्ह्यात काँग्रेस पक्षाला घरघर लागली असल्याचे निष्पन्न होत आहे. एकेकाळी कांग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जाणारा सांगली लोकसभा मतदारसंघ यावेळी काँग्रेसने स्वाभिमानी शेतकरी संघटनेला सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे नाराज झालेले प्रतीक पाटील यांनी हा निर्णय घेतला असल्याचे सांगण्यात येत आहे. सांगली येथे झालेल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात प्रतीक पाटील यांनी ही घोषणा केली. गेल्या काही दिवसांपासून नाराज असलेले प्रतिक पाटील हे राजीनामा देणार असल्याचे बोलले जात होते. परंतु स्वत: प्रतिक पाटील यांनी पक्ष सोडण्याच्या बातमीला नकार दिला होता. मात्र आज अखेर त्यांनी काँग्रेस पक्ष सोडत असल्याचे जाहीर केले आहे.

प्रतिक पाटील हे दिवंगत काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचे नातू आहेत. काँग्रेस पक्षाला आता वसंतदादा पाटील यांची गरज नसल्याचे सांगत काँग्रेस पक्षासोबत असणारे संबंध संपले असल्याचे पाटील यांनी यावेळी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.