ग्वाल्हेर – भाजप खासदार ज्योतिरादित्य शिंदे यांच्या सुरक्षेत मोठी चूक घडल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. यानंतर 14 पोलीस कर्मचाऱ्यांचे तातडीने निलंबनही करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुरैना ते ग्वाल्हेर दरम्यान त्यांच्या वाहनाच्या सुरक्षेसाठी तैनात एस्कॉर्ट वाहन तब्बल 8 किमीपर्यंत कोणा दुसऱ्या वाहनाचा पाठलाग करीत होता. या निष्काळजीपणामुळे 14 पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. ज्योतिरादित्यांना झेड श्रेणीची व्हीआयपी सुरक्षा देण्यात आली आहे.
शिंदे दिल्लीहून ग्वाल्हेरला जात होते, तेव्हा हा प्रकार घडला. सायंकाळी मुरैना जिल्ह्यातील एस्कॉर्ट वाहन शिंदेंच्या वाहनामागे ग्वाल्हेरच्या दिशेने जात होते. निरावलीजवळ मुरैना-ग्वाल्हेर बॉर्डरवर वाहन चालक गोंधळला आणि त्याने शिंदे यांच्या वाहनाचा रंग असलेल्या दुसऱ्या वाहनाचा पाठलाग सुरू केला. 8 किमीपर्यंत पोलीस चुकीच्या रस्त्याने जात होती.
साधारण 8 किलोमीटरपर्यंत पोलीस चुकीच्या रस्त्याने जात होती. जेव्हा पोलिसांना त्यांची चूक लक्षात आली तेव्हा त्यांना धक्काच बसला. दरम्यान शिंदेंची गाडी खूप पुढे निघून गेली होती. जेव्हा शिंदेची गाडी हजारी पोलीस ठाण्याच्या समोरुन गेली तेव्हा सुरक्षेत चूक झाल्याचे लक्षात आले. यानंतर कारवाई करीत मुरैनातील 9 आणि ग्वाल्हेर ठाण्यातील 5 पोलीस कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आले.