पुणे – शहरातील लॉकडाऊनमध्ये काही प्रमाणात शिथिलता करण्यात आल्याने पेट्रोल सगळ्यांनाच उपलब्ध होणार असल्याने वाहनांमध्ये पेट्रोल भरण्यासाठी चालकांनी एकच गर्दी केली होती. पेट्रोल पंप सुरू करण्यात आले असले, तरी त्याच्यावेळा यापूर्वी सारख्याच राहणार आहेत. सकाळी 8 ते दुपारी 2 यावेळेतच पेट्रोल मिळणार आहे, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
जिल्हा प्रशासन ठाम
दरम्यान, दुसरीकडे जिल्हा प्रशासनाने मात्र अद्याप जिल्ह्यात 144 कलम लागू असल्याने यानुसार पेट्रोल सर्वसामान्य नागरिकांना देता येत नाही. याबाबत अधिक माहिती देताना पुरवठा अधिकारी भानुदास गायकवाड म्हणाले, केंद्र आणि राज्य शासनाने माल वाहतुकीला परवानगी दिली आहे, तसेच शेती माल वाहतुकीला सुद्धा मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे या वाहनांना पेट्रोल दिले जावे अन्य कुठल्याही वाहनांना पेट्रोल देता येणार नाही.
गेल्या दीड महिन्यांत फक्त अत्यावश्यक सेवेतील वाहनांना पेट्रोल देण्यात येत होते. आज लॉकडाऊनमध्ये थोडी शिथिलता करण्यात आली आहे. यावेळी पालिका आयुक्तांनी काढलेल्या आदेशात पेट्रोल पंपसुद्धा सुरू करण्यात यावेत, असे म्हटले आहे. त्यानुसार सेवा सुरू केली आहे. आम्ही सगळ्यांनाच पेट्रोल देत आहोत.
– अली दारूवाला, राष्ट्रीय प्रवक्ते, पेट्रोल डिलर असोसिएशन