सिंहगडरस्ता –सिंहगड रस्त्यावरील उड्डाणपुलाची कामे दोन महिन्यांपूर्वी सुरू झाली. मात्र, मेट्रो मार्गिकेसाठी आवश्यक खांबांची उभारणी करण्याच्या प्रस्तावातून आता उड्डाणपुलाच्या कामावर याचा विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे. याच उड्डाणपुलाच्या भूमिपूजनावेळी केंद्रीय भुपृष्ठ आणि दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी दुमजली उड्डाणपूल उभारावा, अशी सूचना केली होती. त्यावेळी उड्डाणपूल दुमजली करता येईल का? याबाबत महापालिका अधिकाऱ्यांनी काही महिने घालविले. दुमजली उड्डाणपूल खर्चिक असल्याचे लक्षात आल्यानंतर तो प्रस्ताव मागे पडला. त्यानंतर उड्डाणपुलाची कामे सुरू झालेली असतानाच मेट्रोचे खांब टाकण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आल्याने सध्या उड्डाणपुलाचे काम थांबले आहे. त्यातच यातून उड्डाणपुलाच्या खर्चात 20 कोटींची वाढ होणार आहे. मात्र, हा वाढीव खर्च महापालिकेने करायचा की महामेट्रोने? असा प्रश्न निर्माण झाला आहे. या कामाच्या गोंधळात वाहतूक कोंडी वाढली आहे. मेट्रो मार्गिकेच्या खांबांमुळे या उड्डाणपुलाची रचना बदलावी लागणार असल्याचे महापालिकेचे अधिकारी सांगत आहेत.
पर्यायी रस्त्यांचा प्रश्न तसाच…
सिंहगड रस्त्याला पर्यायी रस्ता नाही. त्यामुळे या रस्त्यावर वाहतुकीची सातत्याने कोंडी होत असून पर्यायी रस्ते नसतानाही राजाराम पूल ते फनटाइम चित्रपटगृह या दरम्यानच्या उड्डाणपुलाचे काम महापालिकेकडून हाती घेण्यात आले. आता तर तेही बंद आहे, त्यामुळे वाहतूक कोंडीत भरच पडली आहे. पर्यायी रस्ते मार्गी लावा, असे पोलिसांकडूनही महापालिकेला सांगण्यात येत आहे.
पालिकेची निवडणूक लांबल्याने…
सिंहगड रस्त्यावरील मेट्रोचा प्राथमिक आराखडा महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनकडून महापालिकेला सादर करण्यात आलेला नाही. प्राथमिक आराखडा सादर झाल्यानंतर पालिकेची त्याला मंजुरी घ्यावी लागणार आहे. आता, निवडणूक सहा महिने लांबल्याने या प्रक्रियेलाही सहा ते दहा महिने लागण्याची शक्यता आहे. मेट्रोच्या रचनेत बदल झाला तर काय होणार, याबाबतही प्रश्न उपस्थित होत आहेत. त्यामुळे उड्डाणपूल अधांतरी आणि वाहतूक कोंडीअशी स्थिती सिंहगडरस्त्याची झाली आहे.