लसीकरणाची लाभार्थींना फोन करून माहिती
पुणे – संपूर्ण राज्यात दोनवेळा “ड्रायरन’ घेऊनही “कोविन ऍप’चे प्रत्यक्ष लसीकरणावेळी बारा वाजले. शनिवारी लसीकरणाला सुरुवात होणार होती. त्यामुळे शुक्रवारी सायंकाळी पहिल्या शंभर लाभार्थ्यांना “एसएमएस’ पाठवण्यावेळीच हे “ऍप’ बंद पडले. अखेर ते सुरूच न झाल्याने शुक्रवारी रात्री दहा ते अकरादरम्यान कॉल करून आरोग्य अधिकाऱ्यांनी लाभार्थ्यांना लसीकरणासाठी या असे कळवले. त्यामुळे, आयत्या वेळी धावपळ झाल्याने पहिल्या यादीमध्ये असलेल्या अनेक लाभार्थ्यांना लसीकरणापासून वंचित रहावे लागले.
लसीकरणासाठी “कोविनऍप’ वापरले जात आहे. या सॉफ्टवेअरमध्ये सर्व लाभार्थ्यांनी त्यांची माहिती भरली आहे. त्या माहितीच्या आधारेच लाभार्थ्यांना लसीकरणासाठी बोलावण्यात येणार आहे. ज्याचे दुसऱ्या दिवशी लसीकरण आहे त्याला आदल्या दिवशी “एसएमएस’द्वारे माहिती देणार असल्याचे सांगण्यात आले.
परंतु, खूप उशीरापर्यंत प्रयत्न करूनही या सॉफ्टवेअरमधून नियोजित लाभार्थ्याला संदेश पाठवता आला नाही. ऍप उघडल्यावर सर्च, ड्रॉप डाऊन अशा खूप समस्या त्यावर आल्या.
अखेरीस रात्री 11 वाजता जे जे उपलब्ध होते, त्या “हेल्थकेअर्स’ ना कॉल करून दुसऱ्या दिवशी बोलावले. त्यामुळे प्रत्यक्षात लिस्टमध्ये जे पहिल्या नंबरांमधील लाभार्थी होते त्यांना संदेश पोहोचलाच नाही.