मुंबई – विधानसभा निवडणूकीत भाजपकडून मला प्रवेश करण्यासाठी १०० कोटी रुपयांची ऑफर दिली होती. पण ती मी धुडकावली राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांचा सर्वात मोठा गौप्यस्फोट केला. शिंदे यांच्या वक्तव्याने राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. यावर आता भाजपकडून प्रतिक्रिया आली आहे.
गेल्या वर्षी राज्यात विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या. निवडणुकीपूर्वी भाजप ने महाराष्ट्रात मेगा भरती केली होती. इतर पक्षातील मोठमोठे नेते पक्षाला रामराम ठोकून भाजपवासी झाले. अशीच ऑफर मला आल्याचा गौप्यस्फोट आमदार शशिकांत शिंदे यांनी दिली. त्यावर भाजपनेते सुधीर मुनगंटीवार यांनी पलटवार केला आहे. शशिकांत शिंदे यांना निवडणूक खर्चाविषयी ज्ञान नाही. शशिकांत शिंदे हे करोना नंतरचा सर्वात मोठा राजकीय विनोद करत आहेत, अशा शब्दांत मुनगंटीवार यांनी टीका केली.
मला आश्चर्य वाटतं निवडणूक लढवताना 28 लाखांपेक्षा जास्त खर्च करता येत नाही. त्यामुळे शशिकांत शिंदे यांनी शंभर कोटींची ऑफर दिली असं सांगणं म्हणजे त्यांना याबाबत ज्ञान नाही किंवा शशिकांत शिंदे करोना संकटानंतरचा या वर्षातला सर्वात मोठा जोक मारत आहे, असं मुनगंटीवार यांनी म्हटले.
तुम्हाला मंत्रीपद देतो असे सांगुन पोटनिवडणुकीत १०० कोटी खर्च करण्याची ऑफर भाजपने दिली असल्याचा धक्कादायक खुलासा शशिकांत शिंदे यांनी केला आहे. मात्र ही ऑफर त्यावेळेस मी नाकारली होती आणि यापुढेही नाकारणार असल्याचे शशिकांत शिंदे यांनी सांगितले.