पुणे- ऍट्रोसिटीच्या गुन्हयात अटक पुर्व जामिन मिळालेल्या एका महिलेने पोलीस ठाण्यात हजेरीसाठी आल्यावर मोठा गोंधळ घातला. ही घटना कोंढवा पोलीस ठाण्यात घडली. याप्रकरणी संबंधीत महिलेविरुध्द कोंढवा पोलीस ठाण्यात सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल झाला आहे.
पोलीस अंमलदार श्रीकांत शिरोळे यांनी फिर्याद दिली आहे. त्यानूसार कोंढवा खुर्द येथे रहाणाऱ्या 35 वर्षीय महिलेवर गुन्हा दाखल झाला. ती स्वत:ला पत्रकार असल्याचे सांगत आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार संबंधीत महिलेवर ऍट्रोसिटीचा गुन्हा दाखल आहे.
न्यायालयाने तीला काही अट घालून अटक पुर्व जामिन मंजूर केला आहे. त्यानूसार तीने आठवड्यातून दोन दिवस पोलीस ठाण्यात काही तास येऊन तपासात सहकार्य करावे. ती सोमवारी दुपारी पोलीस ठाण्यात दाखल झाली.
तीने आल्या आल्या माझी स्वाक्षरी घ्या मला जायचे आहे असा तगादा लावला. पोलिसांनी तीला आधारकार्ड, मोबाईलनंबर व दोन साक्षीदारांचे नंबर मागीतले. मात्र ती सहकार्य करायचे सोडून पोलिसांच्या अंगावर धाऊन आली.
यानंतर तीने मोबाईलमधून पोलिसांच्या कामकाजाचे शुटींग सुरु करत पोलिसांवरच आरोप करायला सुरवात केली. महिला कर्मचारी समजावून सांगण्यास गेले असता, त्यांनाही धक्का-बुक्की केली. यानंतर तीच्यावर सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला.