हसावं की रडावं हेच कन्फ्यूजन

आपण भारतीय माणसं भक्‍कम आहोत. आपली रोगप्रतिकारशक्‍ती अफाट आहे. आपल्याला काय होणार? पश्‍चिमेकडचे लोक खूपच नाजूक आहेत. त्यांना थोडासुद्धा बदल, थोडीसुद्धा प्रतिकूलता बिलकूल सहन होत नाही. आपण बदलाला आणि प्रतिकूल वातावरणाला इतके सरावलो आहोत, की अनुकूल वातावरण मिळालं तरच आजारी पडू कदाचित… इत्यादी वगैरे… जसजसे दिवस पुढे-पुढे सरकत आहेत, तसतसं आपलं ज्ञान वाढतच चाललंय. ज्ञानी माणसं नेहमी अविचल आणि बिनघोर असतात. माणसाला वाटणारी बरीचशी भीती अज्ञानातून येते आणि अज्ञान पळालं की भीतीही पळून जाते, असं म्हणतात.

आपल्या देशात शहाण्यासुरत्या लोकांच्या चर्चेचा नूर सध्या बदललाय. किती दिवस त्याच-त्याच विषयांवर चर्चा करणार? अर्थात, चर्चेसाठी भारतीयांना जितके विषय मिळतात तितके अन्य कोणत्याही देशातल्या लोकांना मिळत नाहीत, याची खात्री बाळगा. आता तर कामधंदा नसल्यामुळे आनंदीआनंद आहे. परंतु काही विषयांच्या चर्चांवर प्रशासनामुळे निर्बंध आले आणि बरेच “विचारी’ लोक मूळ विषयाकडे वळले. अर्थातच, विषयांवर मर्यादा आल्या तरी चर्चा सुरू राहायलाच हव्यात. शो मस्ट गो ऑन! मतं मांडलीच पाहिजेत आणि आपापलं वैचारिक सामर्थ्य सिद्ध झालंच पाहिजे.

एकांतवासाच्या या कालावधीनंतर जेव्हा आपण एकमेकांना पुन्हा भेटू, तोपर्यंत आपणच किती चपखल विचार करतो, हे सिद्ध झालेलं असलंच पाहिजे. यासाठी कंबर कसून सगळेजण प्रयत्नाला लागलेत. “आपल्याकडे लोकांना अजूनही गांभीर्य कसं नाही,’ या विषयावर आपण अत्यंत गंभीर आहोत असं दाखवून चर्चा सुरू करावी आणि जी कोडी शास्त्रज्ञांनाही अजून उलगडलेली नाहीत, ती सहजगत्या उलगडून दाखवावीत, याहून अधिक गांभीर्य असू शकतं का? सुदैवानं, बोलणाऱ्यांपैकी काहीजण पश्‍चिमेकडच्या देशांची ट्रिप करून आलेले असतात. “सुदैवानं’ अशासाठी की, हे वातावरण निर्माण होण्यापूर्वीच त्यांची परदेशवारी आटोपलेली असते. तिकडची स्वच्छता, टापटीप, शिस्त आणि आपल्याकडचा बेशिस्तपणा, गैरव्यवस्था, अस्वच्छता आदींबद्दल बोलण्याचा अधिकृत परवाना त्यांना मिळालेला असतो.

पश्‍चिमेकडील देशांत जेव्हा मृतांचा आकडा प्रचंड प्रमाणात वाढू लागला, तेव्हा “ते’ जात्यात आहेत; आपण सुपात आहोत वगैरे बाबी त्यांनी बोलून पाहिल्या. पण तरीही पाण्डित्य सिद्ध होईना. मग त्यांनी आपल्याकडच्या लोकांची “इम्यून सिस्टिम’ किती आणि का चांगली आहे, या विषयावर बोलायला सुरुवात केली. आपल्याकडे मुळातच अस्वच्छतेची, अनारोग्याची सवय लोकांना आहे आणि त्यामुळेच आपल्याकडे अजूनही बरी स्थिती आहे, असं ही मंडळी बोलू लागली. “तिकडे टॉयलेट सीटवर जेवढे बॅक्‍टेरिया असतात, तेवढे आपल्याकडच्या किचन ओट्यावर असतात,” हा शोध या मंडळींना लागला आणि हसावं की रडावं हेच कळेनासं झालं.

आपल्याकडच्या अस्वच्छतेविषयी चीड व्यक्‍त करावी की आपल्या लोकांच्या “इम्युनिटी’विषयी अभिमान व्यक्‍त करावा, असा यक्षप्रश्‍न सध्या आमच्यासमोर आहे. आत्यंतिक आरोग्यपूर्ण वातावरणात राहणारे पाश्‍चिमात्य लोक नशीबवान की कमनशिबी? आपल्याकडचं वातावरण आरोग्यवर्धक करण्याचा प्रयत्न करावा की अनारोग्याची सवय लावून घ्यावी? अशा चमत्कारिक द्विधेत असतानाच एक चमत्कारिक बातमी पाहिली- सोलापुरात “मॉर्निंग वॉक’साठी गेलेल्या लोकांची “वाहनं’ जप्त झाली. मग सगळं विसरून खळखळून हसलो. म्हणालो, आपण आहोत तिथेच बरे आहोत!

अबाऊट टर्न : हिमांशू

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.