महायुतीतील संभ्रम

देशातील सर्वांत शिस्तबद्ध आणि नियोजनबद्ध पक्ष म्हणून लौकिक असलेल्या भाजपने महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर जो अंतर्गत सर्व्हे केला आहे त्यात महायुतीला 230 जागा मिळतील असा निष्कर्ष काढण्यात आला आहे. महायुतीचे प्रमुख घटक पक्ष असलेल्या भाजप आणि शिवसेनेत इतर राजकीय पक्षांमधून मेगाभरती सुरू असतानाच हा निष्कर्ष समोर आला आहे. काही महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजप आणि शिवसेना यांनी राज्यात 41 जागा जिंकल्या होत्या.

त्यामुळे त्या गणिताचा विचार केला तरी विधानसभा निवडणुकीत या पक्षांना 220 ते 230 जागा मिळू शकतात असा गणिती निष्कर्ष काढता येऊ शकतो; पण भाजपच्या या निष्कर्षामध्ये महायुती हा शब्द आहे म्हणजेच भाजप आणि शिवसेना यांच्याशिवाय महादेव जानकर, रामदास आठवले, सदाभाऊ खोत यांच्या पक्षांचाही त्यात समावेश होतो. राज्यात इतर पक्षांमधून भाजप आणि शिवसेना या पक्षांमध्ये होत असलेले पक्षांतर पाहता या दोन्ही पक्षांची स्वबळावर लढण्याइतकी तयारी झालेली दिसते.

साहजिकच पक्षांतराचा वेग आणि संख्या पाहता इतक्‍या उमेदवारांना उमेदवारी तरी कशी देणार हा प्रश्‍न आहे. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर महाराष्ट्रात भाजपने आपले “मिशन 220′ असल्याची घोषणा केली होती. त्यावेळी महायुती हा विषय नव्हता आता महायुती समोर ठेवून 230 हा आकडा सांगण्यात येत आहे; पण मुळातच महायुतीचे जागावाटप आणि उमेदवारी वाटप ही या दोन्ही पक्षांसाठी मोठी डोकेदुखी ठरणार आहे. सतत सुरू असलेल्या मेगाभरतीमुळे ही डोकेदुखी अधिकच वाढणार आहे. राज्यात जेव्हा भाजप छोटा भाऊ म्हणून वावरत होता तेव्हा 288 जागांचे वाटप शिवसेना 171 आणि भाजप 117 असे असायचे.

मागील विधानसभा निवडणुकीत शिवसेनेने 150 पेक्षा जास्त जागांची मागणी केली होती; पण शतप्रतिशत या सूत्राचा वापर करणाऱ्या भाजपने ही मागणी नाकारली होती. त्यानंतर युती न झाल्याने या दोन्हीही पक्षांनी सर्व जागा लढल्या होत्या. त्यामुळे भाजपला आपल्या मित्रपक्षांना काही जागा देणे शक्‍य झाले होते; पण आता महायुती असताना शिवसेना पुन्हा किमान 144 पेक्षा जास्त जागांची मागणी करीत आहे. गेल्यावेळी 288 जागा लढवल्यानंतर भाजपच्या 123 जागा निवडून आल्या होत्या. म्हणजेच या जागा भाजप पुन्हा लढवणार आहे. भाजपच्या इतर मित्रपक्षांची जागांची मागणीही जास्त आहे. ती कशी पूर्ण होणार हा एक प्रश्‍न आहे. दुसरीकडे कॉंग्रेस किंवा राष्ट्रवादीतून भाजपमध्ये आलेल्या नेत्यांनाही उमेदवारी हवी आहे. पुन्हा आमदार होता यावे म्हणूनच त्यांनी पक्षबदल केला आहे.

या नेत्यांना उमेदवारी कशी देणार हा दुसरा प्रश्‍न आहे. गेल्यावेळी जागावाटप करताना भाजप आणि शिवसेना यांनी प्रत्येकी 135 जागा लढवाव्यात आणि मित्रपक्षांना 18 जागा ठेवाव्यात, असे एक सूत्र आले होते. पण ते फिस्कटले होते. यावेळी हा गुंता अधिकच वाढण्याची शक्‍यता आहे. विधानसभेत युतीसाठी शिवसेनेचा किमान निम्म्या जागांचा आग्रह कायम असला तरी भाजपचा वरचष्मा ठेवून शिवसेनेला 120 जागांचा प्रस्ताव भाजप देण्याची शक्‍यता आहे. राज्यात भाजपची ताकद वाढल्याने भाजपला 117 आणि शिवसेनेला 171 हे जागावाटपाचे सूत्र आता उलट करण्याचे भाजपचे प्रयत्न आहेत. पण शिवसेना त्याला तयार असण्याची शक्‍यता खूपच कमी आहे. जागावाटप ठरले असल्याची माहिती शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे कायम देत असले तरी त्याचे सूत्र अद्याप जाहीर करण्यात आलेले नाही.

साहजिकच या दोन्ही पक्षांनी स्वबळावर लढण्याचीही तयारी सुरू ठेवली आहे. युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे हे वरळी मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्या दृष्टीने शिवसैनिकांना कामाला लागण्याचे आदेश देण्यात आले आहेत, हा त्याचाच भाग आहे. मुंबई आणि राज्यात इतरत्रही आदित्य ठाकरे यांचा उल्लेख भावी मुख्यमंत्री म्हणून वारंवार केला जात आहे. त्याला निश्‍चितच काही अर्थ आहे. आदित्य ठाकरे यांच्या जन आशीर्वाद यात्रेच्या माध्यमातून शिवसेनेनेही सर्व जागा लढविण्याची तयारी सुरू ठेवली आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीच्या ऐनवेळी युती तुटल्याने शिवसेनेची पंचाईत झाली होती. त्यामुळे यावेळी गाफील न राहता अन्य पक्षांमधील नेत्यांना शिवसेनेत प्रवेश देऊन निवडणूक लढण्याची तयारी करण्यात येत आहे. शिवसेनेतील भरतीलाही तोच अर्थ आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्राही याच एका कारणासाठी काढण्यात आली आहे.

पक्षातील अनेक नेते राज्याच्या विविध भागात दौरे करून चाचपणी करीत आहेत, यालाही काही अर्थ आहे. गेल्यावेळी स्वबळावर निवडणूक लढवून भाजपने सत्ता मिळवली असल्याने त्यांना तशी कोणतीच भीती नाही. लोकसभा निवडणुकीत भाजपच्या एकूण जागा वाढल्या तशा राज्यातही जागा वाढतील आणि भाजप बहुमताचा 144 आकडा गाठू शकेल असा पक्षाला विश्‍वास आहे. गेल्यावेळी भाजपला 25 जागा कमी पडल्या होत्या. स्वबळावर निवडणूक झाली तर त्यापेक्षा जास्त जागा निवडून आणण्याची भाजपची तयारी आहे; पण तेवढी तयारी शिवसेनेची नाही. याच एका मुद्द्यावर भाजप शिवसेनेशी जागांबाबत वाटाघाटी करू शकेल; पण या दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये जो संभ्रम आहे त्याकडेही गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. मुळात पक्षात असलेले नेते आणि आमदार आणि दुसऱ्या पक्षातून आलेले इच्छुक नेते या सर्वांना खूश कसे करायचे हा सर्वांत मोठा प्रश्‍न आहे.

विरोधकांना संपवणे या एकाच हेतूने मेगाभरतीचे शस्त्र वापरण्यात येत असले तरी हेच शस्त्र महायुतीवर उलटू शकते हे लक्षात घेण्याची गरज आहे. येत्या काही दिवसांत निवडणूक जाहीर होईल. त्यापूर्वीच हा संभ्रम संपवण्यासाठी या दोन्ही पक्षांना काम करावे लागेल. भाजपच्या सर्व्हेप्रमाणे महायुतीला किती जागा मिळतील हे समोर आले आहे. अर्थातच फक्‍त भाजपला स्वबळावर किती जागा मिळतील याचा आकडाही त्यांच्याकडे असणार आहे त्यामुळे त्यांना चिंता नाही. पण पुन्हा सत्तेवर येण्याची चांगली संधी असताना संभ्रम आणि संशय दोघांनाही परवडणारा नाही हे लक्षात घ्यावे लागेल.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×