महापरीक्षा पोर्टलच्या परीक्षांत गोंधळ

यंत्रणा बंद करा : एमपीएससी समन्वय समितीचे उपोषण

पुणे – सरकारी पदभरतीसाठी राज्य सरकारने नियुक्‍त केलेल्या “महापरीक्षा’ पोर्टलकडून घेतल्या जाणाऱ्या परीक्षांमध्ये सावळा गोंधळ सुरू आहे. त्यामुळे हे पोर्टल बंद करुन, पुन्हा एमपीएससीमार्फत पदभरती परीक्षा घेण्याची मागणी एमपीएससी समन्वय समितीने केली आहे. त्याकरिता या उमेदवारांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सोमवारपासून (दि.5) आमरण उपोषण सुरू केले आहे.

या पोर्टलकडून घेतल्या जाणाऱ्या परीक्षांमध्ये सामूहिक कॉपी, अभ्यासक्रमानुसार परीक्षा न होणे, प्रश्‍नांची पुनरावृत्ती, मोबाइलसारख्या इलेक्‍ट्रॉनिक माध्यमांचा वापर, बैठक व्यवस्थेचा बोजवारा, वेळेवर परीक्षा न होणे, बायोमेट्रिक हजेरी न घेणे डमी उमेदवार पकडल्यानंतर कारवाई न करणे याशिवाय अन्य गंभीर आरोप या उमेदवारांनी केले आहेत.

दरम्यान, परीक्षांदरम्यान पकडलेल्या डमी उमेदवारांची एसआयटीमार्फत चौकशी करण्याची मागणी या उमेदवारांनी केली आहे. या आंदोलनात ओंकार भुसारी, राहुल कवठेकर, पद्माकर होळंबे, दीपक शिरसाठ, आनंद खांडे, जितु तोरडमल, सचिन साळुंके, राजेश मोरे, भुजंग पवार, संजय पवार आदी उमेदवार सहभागी झाले आहेत.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.