मुंबई : ‘विधीमंडळ हे तर ‘चोर’मंडळ आहे,’असे वक्तव्य ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिंदे गट यांच्यासह भाजपवर निशाणा साधताना केले आहे. पण राऊतांच्या याच वक्तव्यावरुन आज अर्थसंकल्पीय अधिवेशनात गदारोळ सुरु आहे. राऊत यांच्या वादग्रस्त विधानानंतर सत्ताधारी आमदार चांगलेच आक्रमक झाले आहेत.
भाजप नेते अतुल भातखळकर यांनी संजय राऊतांवर विधीमंडळ सभागृहात हक्कभंग आणण्याची मागणी केली आहे. दरम्यान, गोंधळामुळे सभागृहाचे कामकाज 10 मिनिटांसाठी तहकूब करण्यात आले आहे. संजय राऊतांनी ‘चोरमंडळ’ उल्लेख केल्यानंतर भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी आज त्यांच्याविरोधात हक्कभंग आणण्याची मागणी केली.
अतुल भातखळकर यांच्या मागणीला अनुमोदन देताना शिंदे गटाच्या भरत गोगावले यांनीही त्यांना अपशब्द वापरला. राऊतांच्या वक्तव्यासंदर्भात बोलताना अपशब्द वापरल्यानंतर ठाकरे गटाच्या रवींद्र वायकर यांनी आक्षेप घेत गोगावलेंचा समाचार घेतला. या मुद्द्यावरुन सभागृहात गदारोळ झाला.
महाराष्ट्रात विधीमंडळ हे तर ‘चोर’मंडळ, असे म्हणत संजय राऊतांनी शिंदे गट आणि भाजपवर थेट निशाणा साधला आहे. बनावट शिवसेनेने पदावरून काढले तरी आम्ही पक्ष सोडणार नाही, असेही संजय राऊत यांनी बोलताना ठणकावून सांगितले आहे. एकनाथ शिंदे म्हणतात बेळगाव प्रकरणी ते तुरुंगात गेले. त्यांनी त्याची कागदपत्रं दाखवावीत, असे आव्हानही ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केले आहे.