महिला खासदार आणि मार्शल यांच्यात धक्काबुक्की
नवी दिल्ली : महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींच्या मुद्यावर संसदेच्या दोन्ही सभागृहात कॉंग्रेसच्या सदस्यांनी आज निदर्शने करीत गोंधळ घातला. मात्र, मार्शल आणि महिला खासदारांमध्ये धक्काबुक्की झाल्यामुळे वातावरण आणखी चिघळले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या शपथविधीच्या मुद्यावरून कॉंग्रेसच्या खासदारांनी संसदेच्या दोन्ही सभागृहात आज जोरदार गोंधळ केला. लोकसभेच्या कामकाजाला सुरवात होताच कॉंग्रेसचे खासदार हातात फलक घेवून वेलमध्ये आले आणि घोषणा द्यायला लागले.
लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी कॉंग्रेसच्या सदस्यांना घोषणाबाजी थांबवून आपल्या जागेवर जाण्यास सांगितले. मात्र, खासदार ज्योती मणि आणि राम्या हरिदास जागेवर कायम राहिले. यामुळे लोकसभाध्यक्षांनी मार्शलला खासदारांना बाहेर काढण्याचे आदेश दिले. यावेळी मार्शल आणि महिला खासदारांमध्ये धक्काबुक्की झाली.
कॉंग्रेस नेते अधिरंजन चौधरी यांनी मार्शलकडून झालेल्या कारवाईची कठोर शब्दात निंदा केली आहे. लोकशाहीच्या इतिहासात महिला खासदारांसोबत धक्काबुक्कीचा प्रकार पहिल्यांदाच घडला आहे. कॉंग्रेसने याची तक्रार स्पीकर यांच्याकडे केली आहे. आता, अध्यक्ष मार्शल यांच्यावर कोणती कारवाई करतात? याकडे आमचे लक्ष लागून असल्याचे चौधरी यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
महत्वाचे म्हणजे, सभागृहाच्या कामकाजाची सुरवात प्रश्नोत्तराच्या तासाने झाली. लोकसभा अध्यक्षांनी कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांचे नाव प्रश्न विचारण्यासाठी पुकारले. मात्र, महाराष्ट्रात लोकशाहीची हत्या होत आहे. अशात, प्रश्न विचारून काय उपयोग? असे बोलत राहुल गांधी यांनी नकार दिला.