नवी मुंबईतील मतदान याद्यांमध्ये घोळ; राष्ट्रवादी कॉंग्रेस, भाजपचा आरोप

नवी मुंबई  – नवी मुंबईतील महापालिका निवडणूक येत्या दोन महिन्यात होण्याची शक्‍यता असल्याने सध्या मनपा प्रशासनाकडून मतदान याद्या बनविण्याचे काम शेवटच्या टप्प्यात आले आहे. येत्या आठवड्यात अंतिम मतदान यादी जाहीर करण्यात येणार असतानाच राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि भाजपाने मतदान यादीत 90 हजार बोगस नावे टाकण्यात आल्याचा आरोप केला आहे.

विशेष म्हणजे यासाठी अधिकारीवर्गाने लाखो रुपये घेतले असल्याचा गंभीर आरोप भाजप आमदार गणेश नाईक आणि राष्ट्रवादी आमदार शशिकांत शिंदे यांनी केला.

नवी मुंबई महापालिका प्रशासनाने मतदान याद्यांची अंतिम प्रत बनविण्याच्या अगोदर सुचना आणि हरकती मागविल्या आहेत. यानुसार 3698 हरकती मनपा प्रशासनाकडे विविध पक्षांनी, नगरसेवकांनी लेखी स्वरूपात दिल्या आहेत. याबाबत योग्य ते पुरावे तपासून, मतदारांच्या घरी जावून प्रत्यक्ष मतदार संबंधीत पत्त्यावर राहतात का? याची खातरजमा करूनच त्यांची नावे मतदान यादीत समाविष्ट किंवा बाद करण्यात येणार आहेत.

प्रकाशित करण्यात आलेल्या मतदार याद्यांमध्ये 90 हजार बोगस मतदार घुसविण्यात आल्याचा आरोप राष्ट्रवादीचे नेते शशिकांत शिंदे यांनी पत्रकार परिषदेत केला आहे. बोगस नावे मतदान याद्यांमध्ये घुसविण्यात नवी मुंबईतील स्थानिक भाजप नेत्यांचा हात आहे. यासाठी अधिकाऱ्यांना हाताशी धरून एका मताच्या मागे दीड हजार रुपये देण्यात आल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. जोपर्यंत नव्याने फेर मतदार याद्या तयार केल्या जात नाहीत, तोपर्यंत निवडणूक पुढे ढकलण्याची मागणी शिंदे यांनी केली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.