पीपल्स अलायन्समध्ये सहभागी होण्यावरून कॉंग्रेसमध्ये संभ्रम

जम्मू-काश्‍मीरविषयीच्या निर्णयाचा चेंडू आता पक्षश्रेष्ठींच्या कोर्टात

श्रीनगर – जम्मू-काश्‍मीरमधील पीपल्स अलायन्समध्ये सहभागी होण्यावरून प्रदेश कॉंग्रेसमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाल्याचे चित्र आहे. आता त्याविषयीच्या निर्णयाचा चेंडू प्रदेश कॉंग्रेसने पक्षश्रेष्ठींच्या कोर्टात टोलवला आहे.

जम्मू-काश्‍मीरला विशेष राज्याचा दर्जा परत मिळवून देण्यासाठी तेथील भाजपेतर राजकीय पक्ष एकवटले आहेत. त्यातून काही दिवसांपूर्वी सात राजकीय पक्षांनी एकत्र येत पीपल्स अलायन्सची स्थापना केली. मात्र, त्या अलायन्समध्ये कॉंग्रेस पक्ष अद्याप सहभागी झालेला नाही.

पीपल्स अलायन्सच्या आतापर्यंत दोन बैठका झाल्या. त्या बैठकांचे निमंत्रण असूनही कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष गुलाम अहमद मिर उपस्थित राहिले नाहीत. त्यामुळे पीपल्स अलायन्समध्ये सहभागी होण्यावरून कॉंग्रेसमध्ये संभ्रमावस्था असल्याची चर्चा सुरू झाली आहे. त्याविषयीचा प्रश्‍न पत्रकारांनी शनिवारी मिर यांना विचारला.

पहिल्या बैठकीवेळी मी आजारी होतो. तर दुसऱ्या बैठकीवेळी श्रीनगरबाहेर होतो. पीपल्स अलायन्समध्ये सहभागी होण्याच्या मुद्‌द्‌यावर आम्ही पक्षश्रेष्ठींशी चर्चा करणार आहोत. त्यानंतर निर्णय होईल, असे उत्तर मिर यांनी दिले. अर्थात, जम्मू-काश्‍मीरमधील जनतेच्या अधिकारांसाठी लढण्याच्या उद्देशातून समान व्यासपीठ आवश्‍यक असल्याची भूमिकाही त्यांनी मांडली.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.