संभ्रम! अचानक जाहीर केलेल्या निर्बंधांमुळे गोंधळ

पहिल्याच दिवशी लॉकडाऊनचा विस्कळीतपणा


अत्यावश्‍यक सेवा वगळता बहुतांश व्यवहारांवर निर्बंध

पुणे – शहरात करोनाचा संसर्ग टाळण्यासाठी महापालिका प्रशासनाने सोमवारी रात्री आदेश काढत “संचारबंदी’सारखा पर्याय निवडला. याद्वारे अनेक दुकाने बंद करण्याचेही आदेश दिले. पण, त्याची फारशी कोणाला माहिती नसल्याने पुणेकरांमध्ये बरीचशी संभ्रमावस्था दिसून आली. त्यामुळे मंगळवारी दुकाने, हॉटेल्स आदी खुली होती.

तर, नागरिकदेखील घराबाहेर पडत होते. त्यामुळे पहिल्याच दिवशी नियोजनाअभावी लॉकडाऊनचा विस्कळीतपणा दिसला. याशिवाय वाहतुकीतदेखील वाढ दिसून आली. तर, दुसऱ्या बाजूला पोलीस प्रशासन जनजागृतीचा प्रयत्न करत होते.

करोनाची वाढती साथ कमी करण्यासाठी नागरिकांनी स्वयंशिस्तीने नियमांचे पालन करणे आवश्‍यक असल्याचे तज्ज्ञ सांगतात. मात्र, पुणेकरांकडून “स्वयंशिस्ती’लाच हरताळ फासला जात आहे. पर्यायाने प्रशासकीय यंत्रणांकडून नियम आणखी कठोर केले आहेत. परंतु, याचा देखील उपयोग झाला नसल्याचे नागरिकांच्या कृतीतून दिसत आहे.

शहरात सोमवारी संचारबंदीच्या अनुषंगाने नवी नियमावली जाहीर केली. याअंतर्गत अत्यावश्‍यक सेवा वगळता बहुतांश व्यवहारांवर निर्बंध आले आहेत. मात्र, मंगळवारी अनेक ठिकाणी नियमांचे उल्लंघन झाले.

‘कामावर येऊ नका’च्या फोनने चिंता…
मंगळवारी संचारबंदीच्या अंमलबजावणीमुळे अनेक नागरिकांना संबंधित संस्थांनी “कामावर येऊ नका’ असे फोन केले. सकाळी खणाणलेल्या या फोनमुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेकांना सोमवारी दिलेल्या आदेशाची कल्पना नसल्याने नागरिकांसमोर प्रश्‍नचिन्ह उभे राहिले आहे.

वाहतूक कोंडी…
भाजी, फळे, किराणा आदी वस्तू खरेदीसाठी पुणेकरांनी गर्दी केली होती. पर्यायाने नागरिक खासगी वाहने घेऊन घराबाहेर पडल्याने याचा परिणाम वाहतुकीवर झाला होता. यामुळे शहरातील अनेक भागांत वाहतूक कोंडी झाली होती. “पीक अवर्स’मध्ये अनेक ठिकाणी वाहनांच्या रांगा लागल्या.

खरेदीसाठी झुंबड
संचारबंदीबाबत धास्ती असल्याने नागरिकांनी मागील वर्षीप्रमाणे धान्य, किराणा, गृहोपयोगी वस्तू आदींच्या खरेदीसाठी गर्दी केली होती. शहराच्या मध्यवर्ती भागांसह, प्रामुख्याने उपनगरांत अधिक गर्दी होती.

लहान-मोठ्या किराणा दुकानांसह
डी-मार्टसारख्या सुपर मार्केटमध्ये देखील खरेदीसाठी झुंबड होती. यामुळे अनेक दुकानदारांनी याचा फायदा घेत चढ्या दराने साहित्याची विक्री केली.

खासगी कार्यालये, दुकाने सुरू
महापालिकेने अत्यावश्‍यक सेवेतील कार्यालयांची यादी जाहीर केली आहे. संबंधित कार्यालये वगळता अन्य सर्व खासगी कार्यालये बंद ठेवण्याचे आदेश दिले आहे. मात्र, मंगळवारी अनेक खासगी कार्यालये, शोरुम्स, दुकाने खुली होती. यापैकी अनेक ठिकाणी ग्राहकांची गर्दी होती.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.