विद्यार्थी निवडणुकीबाबत संभ्रम

पुणे – राज्य शासन आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून महाविद्यालयीन व विद्यापीठ स्तरावरील विद्यार्थी परिषद निवडणुका पुढे ढकलल्याचे अधिकृत कोणतेही परिपत्रक अद्याप प्रसिद्धच करण्यात आलेले नाही. यामुळे निवडणुका घ्यायच्या, की नाही? असा संभ्रम महाविद्यालयांपुढे निर्माण झाला आहे.

राज्य शासनाने प्रसिद्ध केलेल्या नियमांनुसार जुलै अखेरपर्यंत वेळापत्रक प्रसिद्ध करणे, ऑगस्ट सप्टेंबरमध्ये निवडणूक आणि विद्यार्थी परिषदेची स्थापना करणे बंधनकारक होते. त्यानुसार विद्यापीठाकडून सप्टेंबरमध्ये निवडणुका घेण्याचे वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आले होते. काही विद्यार्थी संघटना निवडणुकीच्या तयारीलाही लागल्या होत्या. दरम्यान, विधानसभा निवडणूक, आपत्कालीन परिस्थिती, कायदा व सुव्यवस्थेचा निर्माण होणारा प्रश्‍न ही कारणे देऊन राज्य सरकारने विद्यापीठ कायद्यात बदल करून निवडणूक पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.

विधानसभा निवडणुकीनंतर ही विद्यार्थी निवडणूक घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे. विद्यापीठाच्या वेळापत्रकानुसार निवडणुकीची तयारी केली होती. पण, राज्य शासन, विद्यापीठाने निवडणूक लांबणीवर टाकल्याबाबत महाविद्यालयांना काहीच कळविलेले नाही. त्यामुळे महाविद्यालये संभ्रमात आहेत, असे गणेशखिंड येथील मॉडर्न महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय खरात यांनी सांगितले आहे.

राज्य मंत्रिमंडळाने विद्यार्थी निवडणुका पुढे ढकलण्याच्या घेतलेल्या निर्णयाला राज्यपालांकडून मान्यता मिळाल्यानंतर विद्यापीठाकडून निवडणूक स्थगित केल्याबद्दलचे परिपत्रक प्रसिद्ध केले जाईल.

डॉ. सदानंद भोसले, प्रभारी संचालक, विद्यार्थी विकास मंडळ,
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.