मुंबई – प्रशिक्षक ग्रॅंट फ्लॉवर यांच्या पाठोपाठ एक खेळाडूही करोनाबाधित आढळल्यामुळे श्रीलंका संघाची चिंता वाढली आहे. हा धोका वाढण्याचीही शक्यता असल्याने भारताविरुद्धची मालिकाही अनिश्चिततेच्या फेऱ्यात आली आहे.
जगभरात करोनाचा धोका अद्याप कायम असल्यामुळे सर्वच मालिका बायोबबल सुरक्षेत व करोनाच्या सर्व नियमांचे पालन करुनच खेळवल्या जात आहे. ही मालिकाही तशीच खेळवली जाणार होती मात्र, आता प्रशिक्षक व खेळाडूलाही करोना झाल्याचे समोर आल्यावर या मालिकेलाही धोका निर्माण झाला आहे.
करोनाचा धोका वाढत असल्यामुळे श्रीलंकेच्या बाधित प्रशिक्षक व खेळाडूसह अन्य काही खेळाडूंनाही विलगीकरणात पाठवले गेले असल्याने मालिकेच्या वेळापत्रकातही बदल करण्यात आला होता. नव्या वेळापत्रकानुसार 18 जुलैपासून भारत विरुद्ध श्रीलंका मालिका होणार आहे.
श्रीलंकेचे खेळाडू सराव न करता मैदानात उतरणार आहेत. दरम्यान, श्रीलंका मंडळाने ही मालिका होणारच असा दावा केला आहे. त्यामुळे पुढील दोन दिवसांत सर्व चित्र स्पष्ट
होणार आहे.