गुंतवणूक करण्यापूर्वी गोंधळलेले मन…

15 दिवसांपूर्वी सौरभ माझ्या ऑफिसमध्ये आला. त्याला अचानक समोर पाहून मला आनंद झाला. पण, आज सौरभ बोलताना काहीसा गोंधळलेला दिसला. स्पष्ट विचारल्यावर बोलला की, गुंतवणूक करायची आहे, पण कुठून सुरुवात करावी आणि नेमका कसा क्रम लावावा काही समजत नाही. मी त्याच्या गोंधळलेल्या मनाचा ठाव घेत गुंतवणुकीबाबत चर्चा करण्यास सुरुवात केली.

तेव्हा तो बोलला की, तीन लाखांचे बॅंकेचे वैयक्तिक कर्ज, सध्या बाबांनी गिफ्ट केलेल्या फ्लॅटचे नऊ हजार भाडे आणि दरमहा हातात मिळणारा तीस हजार रुपये इतका पगार. अशा परिस्थितीमध्ये नेमकी कशी सुरुवात करायची?

मी म्हणाले, तशी परिस्थिती गुंतवणुकीसाठी योग्यच आहे. सर्वात आधी आता तू आर्थिकदृष्ट्या कुठे उभा आहेस, हे पाहिले पाहिजे. अजून एका वर्षानंतर किंवा पाच वर्षांनंतर तुला कुठपर्यंत पोहचायचयं, हे माहिती पाहिजे. जसं की, तुझं काही ध्येय असेल तर ते पूर्ण करताना तुला बऱ्याचदा आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागेल. शिवाय वाढत्या वयाबरोबर तसेच नोकरीच्या नव्या उंचीवर असतानासुध्दा निवृत्ती योजनेकडे दुर्लक्ष करून चालणार नाहीच. म्हणूनच तुझ्या भविष्यातील ठरवलेल्या योजना पैकी महत्वाच्या योजनेला आधी प्राधान्य दे.

आता ध्येयाचा अग्रक्रम ठरवताना, “गरजा आणि इच्छा’ यामध्ये गल्लत करू नकोस. गरज आणि इच्छा असलेली दोन्ही ध्येय व्यवस्थितपणे ठरव. गरजेची म्हणजे अशी ध्येय ज्यांना टाळता येणे शक्‍यच नसते. जसे की, अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य. इच्छित ध्येय म्हणजे अशी ध्येय जी लगेच पूर्ण नाही झाली तरी काही अडत नाही.

जसं की, कार घेणं, सुट्ट्यांमध्ये सहलीला जाणे, विकेंड होम इत्यादी. बऱ्याचदा ठराविक पगाराच्या रकमेव्यतिरिक्त अन्य मिळकतही मिळते. आधीच्या गुंतवणुकीवर व्याज, घरभाडे, पगारातील बोनस. यामुळे सहाजिकच मिळकत वाढते. वाढलेल्या मिळकतीचा आकडा सांगता येतो परंतु जास्तीचे मिळालेले पैसे नेमके कुठे आणि किती खर्च झाले हे सांगणे मात्र कठीण असते. त्यामुळे तू दर महिन्याच्या सुरुवातीला तुझ्या मिळकत आणि खर्चाचे अंदाजपत्रक बनवत जा आणि महिन्याच्या शेवटी तपासून बघ यातील किती गोष्टी यशस्वीरीत्या करायला जमल्या. या सवयींमुळे अधिकच्या खर्चावर नियंत्रण बसेल. गुंतवणुकीची योजना करताना सर्वात आधी जर काही कर्ज असेल तर ते अगदी Priority Basis वर परत केले पाहिजे. कारण गुंतवणुकी वरील मिळकत ठरलेली नसते परंतु कर्जावरील व्याज मात्र ठरलेलं असते. यासाठीच सौरभच्या गुंतवणूक योजनेत भरमसाठ व्याजाचे वैयक्तिक कर्ज आधी देणं गरजेचं होत.

तसेच इतर कर्ज जसं की, क्रेडिट कार्ड लोन, कार लोन, घरखर्च यांसारखी कर्ज घेताना गुंतवणुकीची योग्य ती योजना करूनच घ्यावी. व्यक्तीच्या वयानुसार, अनुभवानुसार मिळकत उत्तरोत्तर वाढत जाते आणि निवृत्ती जवळ येते. त्यामुळे निवृत्ती योजनाही तितकीच महत्त्वाची. एवढं सगळं ऐकून सौरभच्या गोंधळलेल्या मनाचा ताण हलका झाला. थोडंस हसत तो म्हणाला, म्हणजे मला…
-दर महिन्याचे खर्च आणि मिळकतीचे योग्य अंदाजपत्रक बनवले पाहिजे.
– गरज आणि इच्छा ओळखूनच ध्येयांचा अग्रक्रम लावला पाहिजे.
– वैयक्तिक कर्ज लवकरात लवकर देण्याची तरतूद आणि त्या सोबतच आत्तापासूनच निवृत्ती योजना सुरू केली पाहिजे.
त्याच्या उत्तरातच त्याच्या मनातील गोंधळ विरला होता. हसून समारोप करताना गुंतवणुकीची योजना मात्र त्याच्या मनात पक्का आकार घेत होती.

– सीमा जगताप 

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here