स्थायीत विधीतज्ज्ञ निवडीवरून गोंधळ

मनपाच्या पॅनेलवरील विधीतज्ज्ञांची निवड होणार रद्द

नगर  – महापालिकेला कायदेशीर मार्गदर्शन न्यायालयीन कामकाज अधिकृतपणे चालावे यासाठी विधीतज्ज्ञाची नियुक्ती केली जाते. मात्र या विधीतज्ज्ञांची अनाधिकृत निवड करण्यात येत असल्याचे नगरसेवक योगिराज गाडे यांनी निदर्शनास आणूून दिले. विधीतज्ज्ञांची जहिरात देवून त्यांच्या मुलाखती घेवून त्यांची निवड करण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. त्यावर स्थायी समितीत मोठ्या प्रमाणात गोंधळ उडाला.

त्यावर स्थायी समितीचे सभापती मुद्दसर शेख यांनी महापालिकेच्या पॅनलवरील विधीतज्ज्ञ यांची निवड रद्द करून नव्याने विधीतज्ज्ञांची निवड करण्यात येणार आहे. तसेच त्यामध्ये 50 टक्के महिलांचा ही समावेश असल्याचे त्यांनी सांगितले.
महापालिकेत आज झालेल्या स्थायी समितीच्या सभेत सभापती मुदस्सर शेख, नगरसेवक गणेश भोसले, कुमार वाकळे, योगीराज गाडे, आशा कराळे, सोनाली चितळे, सुभाष लोंढे, सुप्रिया जाधव, उपायुक्‍त डॉ. प्रदीप पठारे, नगर सचिव एस. बी. तडवी, मुख्य लेखापरीक्षक चंद्रकांत खरात, प्रभारी शहर अभियंता सुरेश इथापे, प्रवीण मानकर, आस्थापना विभागप्रमुख मेहेर लहारे, पाणीपुरवठा विभागप्रमुख महादेव काकडे आदी उपस्थित होते.

शहरातील भुयारी गटाराच्या कामामुळे शहरातील रस्त्यांची कामे होत नसल्याने नगरसेवक गणेश भोसले यांनी स्थायी समितीच्या सभेत महापालिका अधिकाऱ्यांना स्वतः ठेकेदार आणून काम सुरू करण्याचा इशारा दिला. त्यावर प्रशासनाने कामे लवकरच सुरू होणार असून यात प्रथम तीन रस्त्यांची कामे केली जाणार असल्याचे स्पष्ट केले.

स्थायी समितीच्या सभेत सभापती मुदस्सर शेख यांनी भुयारी गटाराच्या कामामुळे रस्त्याची कामे प्रलंबित असल्याचे सांगितले. मुख्य रस्त्यातील भुयारी गटाराचे काम पूर्ण करून रस्ते लवकर करावेत. कोठला रस्ता व सर्जेपुरातील हत्ती चौकाचा रस्ता खराब झाल्याचे ते म्हणाले. प्रभारी शहर अभियत्यांनी त्या दृष्टीने सध्या पाठपुरावा सुरू असल्याचे सांगितले. यावर गणेश भोसले यांनी प्रभाग 14 मधील रस्ते खराब झाले आहेत.

नागरिक पाठपुरावा करत आहेत. आठवड्याभरात काम सुरू न झाल्यास ठेकेदाराला धरून आणून रस्त्याचे काम केले जाईल. लवकरात लवकर रस्त्याच्या कामाला मंजुरी द्या अशी सूचना मांडली. यावर इथापे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जाणारे रस्ते, फटकण पोलीस चौकी ते सर्जेपुरातील श्रीराम पेट्रोलपंप व रामवाडी ते तारकपूर या तीन रस्त्यांची कामे लवकरच सुरू होणार असल्याचे सांगितले.

यावेळी भोसले यांनी महापालिकेतील नगररचना विभागाकडून टीडीआरसाठी ठरावीक वकिलाकडेच पाठविले जाते. तो वकील 14 हजार रुपये शुल्क घेतो व तेच काम दुसरे वकील केवळ दोन हजार 700 रुपयांतूनच करून देतात. नगररचना विभागातील कामे ठरावीक वकिलांनाच का मिळतात? महापालिकेतील वकील सर्वसामान्यांना लुटतात, मग इतरांना व महापालिकेला लुटत नसतील हे कशावरून? त्यासाठी महापालिकेच्या वकिलांच्या पॅनलवर येण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, असा आरोप गणेश भोसले यांनी केला.

अनेक गावांची 59 कोटी 2 लाख 36 हजार पाणीपट्टी थकित
नगर शहरातील पाणीपुरवठा योजनेतून शहराजवळील काही गावांना पाणीपुरवठा केला जातो. यातील काही गावांची 1999 पासून पाणीपट्टी 59 कोटी 2 लाख 36 हजार 10 रुपये थकित असल्याचे सांगण्यात आले. यावर सभापती मुदस्सर शेख यांनी या गावांना मागील थकबाकीचे एक बिल व चालू बिल असे हप्ते पाडून देण्यास सांगितले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.