सामाजिक : कटुतेसह नाती नकोतच!

– डॉ. ऋतु सारस्वत

विवाहसंबंधांमधील माधुर्य संपुष्टात आल्यामुळे घटस्फोट घेण्याची तरतूद हिंदू विवाह कायद्यात नसल्यामुळे अन्य कारणे शोधली जातात किंवा अशी परिस्थिती निर्माण केली जाते, जी घटस्फोटासाठी आधारभूत ठरू शकेल. ही परिस्थिती आत्यंतिक वेदना आणि नैराश्‍याला जन्म देणारी असते.

भारतीय कुटुंबांमध्ये वैवाहिक संबंधांत अशा काही घटना घडू लागल्या आहेत, ज्या अत्यंत चिंताजनक आहेत. काही दिवसांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या दोन निकालांमधून असे स्पष्ट होत आहे की, वैवाहिक संबंधांमधील संघर्ष आत्यंतिक गंभीर आजार बनत चालला आहे. न्यायालयाने पत्नीला आपल्यासोबत राहण्याचा आदेश द्यावा, अशी मागणी करणारी एका पतीची याचिका न्यायालयाने फेटाळून लावली आणि पत्नी ही पतीची मालमत्ता नसल्याचे स्पष्ट केले. काही दिवसांपूर्वी अन्य एका प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने अशाच प्रकारे संबंध पुनःप्रस्थापित करण्याची एका पत्नीची मागणी फेटाळली होती. पत्नीने पतीवर विचित्र पद्धतीने दोषारोप केल्यामुळे त्याच्या करिअर आणि प्रतिष्ठेला धक्‍का बसला होता. तरीही पत्नीने संबंध पुनःप्रस्थापित करण्याची मागणी केली होती. ही दोन्ही प्रकरणे अशा प्रकारची आहेत, ज्यात संबंधांमध्ये आत्यंतिक कडवटपणा येऊनसुद्धा पती-पत्नीमधील एकजण संबंध तोडू इच्छित नाही. आपल्या सहचराला किंवा सहचारिणीला मानसिकदृष्ट्या छळता यावे म्हणूनच लोक अशी मागणी करतात, हे उघड आहे.

वैवाहिक संबंधांचे रूपांतर अशा प्रकारे रणभूमीमध्ये होणे उचित आहे का? लग्न झाल्यावर या संबंधांचे दोघांकडूनही पालन केले जाणे हीच आदर्श स्थिती आहे. परंतु हे व्यावहारिक आहे का? दोघांचे विचार वेगवेगळे असताना किंवा दोघांमधील संघर्ष विकोपाला गेल्यानंतरसुद्धा दोघांकडून एकत्र राहण्याची अपेक्षा करता येईल का? ज्यांचे कोणत्याही मुद्द्यावर एकमत होत नाही, ज्या दोन व्यक्‍तींमध्ये कडवटपणा टोकाला गेला आहे, एकमेकांबद्दल घृणा आहे, दोन अशा व्यक्‍तींनी एका छताखाली राहणे खरोखर उचित ठरेल का? याचे उत्तर नकारार्थी आहे; कारण आई-वडिलांमध्ये सातत्याने होत असलेला संघर्ष पाहून मुलांच्या मनात भीती आणि नैराश्‍याची भावना निर्माण होते, असे अनेक संशोधनांमधून स्पष्ट झाले आहे.

जागतिकीकरण, उदारीकरण सुरू झाल्यानंतर आणि सामाजिक, नैतिक मूल्यांमध्ये बदल झाल्यानंतर विवाह हे कर्तव्य बजावण्याचे माध्यम न ठरता अधिकारांच्या प्राप्तीसाठीची रणभूमी ठरली आहे, हे वास्तव नाकारता येत नाही. वैवाहिक संबंधांमध्ये एखादी व्यक्‍ती कर्तव्य बजावण्यात स्वतःला अकार्यक्षम मानते आणि विवाहसंबंध तोडू पाहते. मात्र, दुसरी व्यक्‍ती कायद्याचा आणि समाजाचा दबाव निर्माण करून संबंध पूर्ववत राखण्यास दुसऱ्या व्यक्‍तीस भाग पाडू पाहते. या प्रक्रियेत अनेकदा दोघांपैकी एकव्यक्‍ती दुसऱ्या व्यक्‍तीचे सामाजिक आणि मानसिक नुकसान करण्याचा प्रयत्न करते. भारतातील कायदेशीर प्रक्रिया खूप जटिल आणि प्रदीर्घ असल्यामुळे त्याचा फायदा घेत कायद्याचा दुरुपयोग करून घटस्फोट लांबविले जातात. अशी अनेक प्रकरणे न्यायालयासमोर येतात. बहुतांश प्रकरणांमध्ये एक व्यक्‍ती दुसऱ्याला घटस्फोट देऊ इच्छित नाही, कारण ती त्याला मानसिक त्रास देऊ इच्छित असते.

कोणत्याही कारणामुळे जेव्हा वैवाहिक संबंधांमध्ये कटुता निर्माण होते, आणि विवाहसंबंधांमधील माधुर्य संपुष्टात आल्यामुळे घटस्फोट घेण्याची तरतूद हिंदू विवाह कायद्यात नसल्यामुळे अन्य कारणे शोधली जातात किंवा अशी परिस्थिती निर्माण केली जाते, जी घटस्फोटासाठी आधारभूत ठरू शकेल. ही परिस्थिती आत्यंतिक वेदना आणि नैराश्‍याला जन्म देणारी असते. ज्या वातावरणात घुसमट होईल, अशा वातावरणात पती-पत्नी दोघांना एकत्र राहण्याचा सल्ला देणे म्हणजे दोघांनाही नैराश्‍याच्या दिशेने ढकलण्यासारखे आहे, हे आपल्याकडील अनेकजण मान्यच करायला तयार होणार नाहीत. उभयतांमध्ये मतभेद असताना त्यांना एकत्रित राहण्याचा सल्ला देणे कोणत्याही दृष्टीने योग्य ठरत नाही, हेच आपल्याला समजत नाही. भारतीय समाजात पाश्‍चात्य संस्कृतीप्रमाणे संबंध ताबडतोब तोडले जात नाहीत, असा युक्‍तिवाद केला जातो; परंतु तो अनुचित आणि हास्यास्पद आहे. कारण जगातील कोणत्याही संस्कृतीने घटस्फोटाचे समर्थन केलेले नाही.

दुसरी परिस्थिती अशी की, संबंधांमध्ये कटुता असली तरी मुलांसाठी म्हणून संबंध कायम राखण्याचा सल्ला पती-पत्नीला दिला जातो. परंतु ही परिस्थिती मुलांच्या भवितव्याच्या दृष्टीने खरोखर हितकारक असते का? अनेक प्रकरणांमध्ये असे दिसून आले आहे की, संबंधात कटुता आल्यावर पत्नी आणि तिच्या माहेरची मंडळी वडिलांच्या विरोधात मुलांचे कान भरण्याचा प्रयत्न करतात. ब्रिटनमध्ये 2008 मध्ये 12 हजार 877 मुलांविषयी केलेल्या संशोधनात असे आढळून आले होते की, तणावग्रस्त वातावरणात राहणारी मुले एकलकोंडी होतात. याउलट तणावापासून, पालकांपासून दूर राहिल्यास ती अधिक
आनंदी राहतात.

नात्यांमध्ये अनेक प्रकारचे गुंते असतात आणि जेव्हा दोन व्यक्‍तींच्या जीवनात कसल्याही प्रकारचा ताळमेळ नसतो तेव्हा त्यांनी वेगळे होणेच त्यांच्यासाठी आणि समाजासाठी हितावह असते, असे अनुभवावरून सांगता येते. याखेरीज संबंध तोडण्यासाठी जी वेगवेगळी कारणे उभी केली जातात, त्यामुळे विनाकारण क्रौर्य वाढते तसेच न्यायिक प्रक्रियेचा दुरुपयोगही केला जातो. त्यामुळे नको असलेले संबंध तोडण्यासाठी स्वीकारली जाणारी आक्रमकता रोखण्यासाठी नवीन कायदे तयार करण्याची आजमितीस गरज निर्माण झाली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.