तंटामुक्‍ती अध्यक्षपदावरून गावात तंटे

– संतोष वळसे पाटील

ग्रामसभामध्ये गावच्या तंटामुक्‍तीचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांच्या निवडीवरून तंटे सुरू झाले आहेत. तंटामुक्‍तीचे अध्यक्ष पद हे बहुतांशी गावांमध्ये शोभेचे पद म्हणून मिरवणारे अध्यक्षही पहावयास मिळतात. तंटामुक्‍ती अध्यक्ष पदासाठी बहुतेक गावांमध्ये रस्सीखेच आणि हाणामारी झाल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत.

गावांमध्ये असणारे शिवसेना, राष्ट्रवादी, भाजप, कॉंग्रेस, मनसे, रिपब्लिकन पार्टी अशा विविध पक्षांच्या माध्यमातून अध्यक्षपदी निवड व्हावी याकरिता स्थानिक प्रतिनिधींना हाताशी धरून अध्यक्षपद आपल्यालाच मिळाले पाहिजे. यासाठी जोरदार रस्सीखेच सुरू आहे. वेळप्रसंगी ग्रामसभेमध्ये हाणामारी सुद्धा होत आहेत. अध्यक्षपदासाठी इच्छुकांची संख्या भरपूर असल्याचे दिसून येत आहे.

तंटामुक्‍ती अध्यक्ष पदासाठी ग्रामसभेत आवाजी मतदानाने, हात उंच करुन किंवा चिठ्ठीद्वारे मतदानाने निवड होत आहे. तंटामुक्‍ती अध्यक्ष पद हे शोभेचे पद झाले आहे. गावातील तंटे गावातच मिटावे या उद्देशाने राज्य सरकारने महात्मा गांधी तंटामुक्‍ती योजना राबविली होती, परंतु त्याला कुठेतरी खंड पडत असून गालबोट लागल्याचे दिसून येत आहे. गावातील तंटे गावातच मिटले पाहिजे. हा शासनाचा मूळ उद्देश ही समिती स्थापन करण्यामागे होता, परंतु तसे न होता तंटामुक्‍ती अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडी वरुनच गावात तंटे होऊ लागले आहेत. काही गावांत सामंजस्याची भूमिका घेऊन एक मुखाने गावातच तंटामुक्‍ती अध्यक्ष व उपाध्यक्षांची निवड करण्यात येत आहे, परंतु काही गावांत अपवाद होवून तंटामुक्‍ती अध्यक्ष पदावरून हाणामारी देखील होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.