पदवी प्रमाणपत्रातील मजकुराची विद्यार्थ्यांकडूनच खातरजमा

चुका राहू नये यासाठी पुणे विद्यापीठाकडून खबरदारी

पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परीक्षा विभागामार्फत पदवी प्रमाणपत्रात चुका राहू नये, यासाठी विद्यार्थ्यांकडूनच ई-मेलद्वारे मजकुराची खातरजमा करण्यात येत आहे. त्यामुळे आता पदवी प्रमाणपत्रात काहीच चुका राहणार नसल्याची चिन्हे आहेत. पदवीपदान समारंभापूर्वीच विद्यार्थ्यांकडून प्रमाणपत्रावर चुका दुरुस्त केल्या जाणार आहेत. त्यामुळे सुधारित प्रमाणपत्रासाठी अर्ज करण्याची वेळ विद्यार्थ्यांवर येणार नसल्याचे दिसून येत आहे.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा पदवीप्रदान समारंभ येत्या महिनाभरात होण्याची शक्‍यता आहे. वाढत्या करोना संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर हा समारंभ ऑनलाइन होण्याची शक्‍यता आहे. विद्यापीठाने पदवी प्रमाणपत्रासाठी ऑनलाइन अर्ज मागविले होते. त्यात 1 लाख 67 हजार विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत. पुणे विद्यापीठात पदवी प्रमाणपत्रासाठी अर्ज केल्यानंतर विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या माहितीमध्ये किंवा विद्यापीठाने प्रमाणपत्र तयार करताना काही त्रुटी राहू शकतात. मात्र, यापूर्वी त्याची खातरजमा केली जात नव्हती.

पदवी प्रदान समारंभ झाल्यानंतर विद्यार्थ्यांना थेट विद्यापीठात किंवा पोस्टाने प्रमाणपत्र पाठविली जात. प्रमाणपत्र मिळाल्यानंतर त्यामध्ये पदवीचे नाव, वर्ष, विद्यार्थ्याचे नाव, अडनाव यासह इतर चुका आढळून येत. त्यामुळे सुधारित पदवी प्रमाणपत्र मिळावे यासाठी विद्यार्थी परीक्षा मंडळाकडे अर्ज करतात. यात परीक्षा विभागाचा वेळ जातो. शिवाय, नवीन पदवी तयार करण्यासाठी सुमारे 60 रुपये खर्च येतो. किरकोळ चुकांसाठीची ही मोठी प्रक्रिया यापुढे करावी लागणार नाही, अशी व्यवस्था विद्यापीठाने केली आहे.

परीक्षा विभागाने ज्या विद्यार्थ्यांनी पदवी प्रमाणपत्रासाठी अर्ज केले आहेत, त्यांना पदवीचे प्रारुप स्वरुप ई-मेलद्वारे पाठविले आहे. त्यात विद्यार्थ्यांनी पदवी प्रमाणपत्र बघून त्यात काही चुका आहेत का हे तपासावे, अशी सूचना विद्यार्थ्यांना दिल्या आहेत. पुढील चार ते पाच दिवसांमध्ये ही सर्व प्रक्रिया पूर्ण होणार आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.