गाझीच्या संपर्कात असल्याची संशयीतांची कबुली

लखनौ – उत्तरप्रदेशातील सहारनपुर येथून दहशतवाद्यांशी लागेबांधे असलेल्या दोन संशयितांना अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्या या संशयित युवकांनी आपला जैश ए महंमद या संघटनेशी संबंध असल्याची कबुली दिली आहे. तसेच पुलवामा येथील हल्ल्याचा मास्टरमाईंड अब्दुल रशिद गाझी याच्याही आपण संपर्कात होतो याची कबुली त्यांनी दिली आहे अशी माहिती एनआयएच्या सूत्रांनी दिली आहे.

शहानवाज तेली आणि अब्दुल अकिब मलिक अशी पकडण्यात आलेल्या दोन युवकांची नावे असून ते दोन्हीही काश्‍मीरातील आहेत. त्यांच्यापैकी एकाच्या मोबाईलवर एक व्हॉईस एसएमएस आढळला असून त्यात बडा काम आणि सम्मान अशा सांकेतीक शब्दप्रयोगांचा वापर करण्यात आल्याचे आढळून आले आहे. बडा काम म्हणजेच पुलवामा हल्ल्याची योजना असाच अर्थ असून सम्मान हा शब्द यातील स्फोटकांसाठी वापरण्यात आल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे असेही तपास अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

जम्मू काश्‍मीर पोलिसदलाचे महासंचालक ओपी सिंह यांनी या दोन्ही संशयितांची सुमारे चार तास कसून चौकशी केली त्यात त्यांनी आपला जैश ए महंमद या संघटनेशी संबंध असल्याचे मान्य केले आहे. शहानवाज याने तपास अधिकाऱ्यांशी बोलताना कबुल केले आहे की गेली 18 महिने तो जैश ए महंमद या संघटनेशी संपर्कात होता. तर अकिब हा सहा महिन्यापुर्वी या संघटनेच्या संपर्कात आला आहे.

यातील शहानवाज हा गाझीच्या जास्त संपर्कात होता. त्यांच्या मोबाईवर सापडलेल्या चॅटिंग संदेशांमध्ये काही संशयास्पद संदेश सापडले आहेत त्यात शस्त्रे किंवा स्फोटकांचा साठा कोठे हालवायचा या संबंधात काही सांकेतिक शब्द वापरून सुचना देण्यात आल्या आहेत. त्याचा नेमका अर्थ लावण्याचे काम सुरू आहे असे संबंधीत सूत्रांनी म्हटले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.