पुणे – गेल्या काही महिन्यांत शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या अनुषंगाने काही अनुचित घटना घडल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थी सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या घटनेची शासन स्तरावर गंभीर दखल घेण्यात आली. शालेय विद्यार्थ्यांच्या विशेषतः मुलींच्या सुरक्षिततेसाठी उपाय योजनासंदर्भात शासनस्तरावरून वेळोवेळी आदेश जारी करण्यात आले. मात्र, तरीही शाळांमध्ये विद्यार्थी सुरक्षा संबंधी अनेक त्रुटी आढळून आल्या आहेत.
शाळा व परिसरातील सुरक्षिततेबाबत विविध माध्यमांतून तक्रारी, आक्षेप शासनाकडे प्राप्त झालेल्या आहेत. त्याची दखल घेत शिक्षण आयुक्तालयातील शिक्षण सहसंचालक दिलीप जगदाळे यांनी राज्यातील सर्व संचालक, विभागीय शिक्षण उपसंचालकांना आदेश बजाविले आहेत. शालेय विद्यार्थी सुरक्षा संबंधी त्रुटी राहिल्याबद्दल शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी शाळांना नोटीसा दिलेल्या आहेत, त्याानंतरही पुढे कोणतीही कार्यवाही झालेली नाही.
शाळांमध्ये आढळेल्या त्रुटी…
सीसीटीव्ही बंद स्थितीमध्ये आहेत.
सीसीटीव्ही फुटेज तपासले जात नाही.
सीसीटीव्हीचे बॅकअप ठेवण्यात येत नाही.
विविध समित्या केवळ कागदावरच.
निरीक्षणासाठी अहवाल उपलब्ध नाहीत.
स्कूल वाहन सुरक्षासंबंधी उपाय नाहीत.
चालकांचे फोनक्रमांक उपलब्ध नाहीत.
कर्मचाऱ्यांची चारित्र्य पडताळणी नाही.
७ नोव्हेंबर पूर्वी अहवाल द्या….
शाळा सुरक्षासंबंधी सद्यस्थितीतील प्रगतीच्या तपशीलासह माहिती नव्याने सादर करावी. वस्तुस्थितीदर्शक तपशीलवार अहवाल सादर करण्यात यावा. अधिकारी यांनी कारवाई प्रलंबित ठेवली असेल अगर केलेली नसेल तर त्याबद्दल खुलासा घेऊन तसा अहवाल सादर करावा.
या संदर्भात केलेल्या कार्यवाहीचा अहवाल येत्या ७ नोव्हेंबर पूर्वी शिक्षण शिक्षण आयुक्तालयात सादर करण्याबाबतच्या सूचना शिक्षण आयुक्तालयातील शिक्षण सहसंचालक दिलीप जगदाळे यांनी केली आहे.