शौचालय दिनानिमित्त शाळांमध्ये उपक्रम राबवा

मिपाने दिल्या अधिकाऱ्यांना सूचना : शौचालयांच्या सुविधांमध्ये सुधारणा करावी लागणार

पुणे – राज्यात जागतिक शौचालय दिनानिमित्ताने शाळांमधील शौचालयांच्या सुविधांमध्ये सुधारणा कराव्या लागणार आहेत. यासाठी आता आठवडाभर विविध उपक्रम राबविण्याच्या सूचना महाराष्ट्र शैक्षणिक नियोजन व प्रशासन संस्थेने (मिपा) अधिकारी, शाळांना दिल्या आहेत.

संपूर्ण देशात स्वच्छ भारत, स्वच्छ विद्यालय हे अभियान राबविण्यात येत असून त्याअंतर्गत जागतिक शौचालय दिन साजरा केला जात आहे. ग्रामपंचायत, शाळा व्यवस्थापन समिती, गावातील प्रतिष्ठित व्यक्ती यांचे शाळांमधील शौचालयांच्या सुविधांकडे लक्ष वेधून घेण्याची गरज निर्माण झाली आहे.

शौचालयांची सुविधा शाळेत नसल्याने विद्यार्थ्यांच्या होणाऱ्या गैरसोयींमुळे शैक्षणिक नुकसानीवर एकांकिका बसवून त्याचे शाळेच्या परिपाठात व गावात सादरीकरण करावे लागणार आहे. बंद असलेली शौचालये उघडावी लागणार आहेत. शौचालयात पाण्यासह इतर आवश्‍यक त्या सुविधा उपलब्ध करून देण्याला प्राधान्य द्यावेच लागणार आहे. शौचालयाच्या साफसफाई संदर्भात शाळेतील समित्यांना वेळोवेळी बैठका घेण्याला प्रोत्साहित करावे लागणार आहे. चला पाहुया शाळेचे शौचालय हा उपक्रमही राबवून शौचालयाची पाहणी करणे गरजेचे आहे. यावर एकादी एकांकिका, गाणे सादर करणे अपेक्षित आहे, अशा सूचना मिपाच्या संचालक डॉ.नेहा बेलसरे यांनी जिल्हा परिषद, महापालिकेच्या प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाधिकारी, शिक्षण निरीक्षक, नगर परिषदेचे प्रशासन अधिकारी यांना दिल्या आहेत.

उपक्रमांचा अहवाल ई-मेलद्वारे पाठवा
शौचालय कसे वापरावे याचे सचित्र पोस्टर्स, पेटींग्ज तयार करावी. कौन बनेगा करोडपतीच्या धर्तीवर शाळेत कौन बनेगा क्‍लीन ही प्रश्‍नमंजूषा घेण्यात यावी. शाळांमध्ये उपक्रम राबवून त्यांची नोंद ठेवण्यात यावी. उपक्रमांचा अहवाल ई-मेलद्वारे पाठविण्यात यावा, असेही सूचनांमध्ये स्पष्ट करण्यात आलेले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.