काळाघोडा फेस्टीव्हलला खाद्यपदार्थ विक्रीस मनाई
मुंबई : तरूणाईचे आकर्षण असेलेल्या काळा घोडा फेस्टीव्हल, क्रॉस मैदानावर घेण्यास उच्च न्यायालयाने आज सशर्त परवानगी दिली. 1 फेब्रुवारी पासून 9 फेब्रुवारी पर्यंत चालणाऱ्या या फस्टिव्हलमध्ये खाद्यपदार्थ स्टॉल लावण्यास तसेच ते पदार्थ विक्रीसाठी क्रास मैदानाचा वापर करण्यास मुंबई उच्च न्यायालयाने मनाई केली. खंडपीठाने केवळ सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी मैदानाचा वापर करण्याचे आदेश दिले.
दक्षिण मुंबईतील काळा घोडा परिसर शांतता क्षेत्र म्हणून घोषित झाल्यानंतर काळा घोडा महोत्सवांतर्गत सांस्कृतिक कार्यक्रम काही वर्षांपूर्वी चर्चगेटच्या क्रॉस मैदानावर घेतले जात आहे. मात्र या मैदानावर कोणताही कार्यक्रम आयोजित करण्यापूर्वी उच्च न्यायालयाची परवानगी घेणे बंधनकारक असल्याने काळा घोडा महोत्सव आयोजकांना न्यायालयाच्या परवानगीसाठी याचिका दाखल केली होती.
या यचिकेवर आज सुनावणी झाली. यावेळी उभय पक्षांचा युक्तीवाद आणि जिल्हाधिकाऱ्यांनी दाखल केलेल्या ना हरकत प्रमाणापत्राची दखल घेऊन न्यायलयाने पुढील महिन्यात 1 फेब्रुवारी पासून सुरू होणाऱ्या या महोत्सवाअंतर्गत खाद्य पदार्थ स्टॉल लावण्यासाठी तसेच व्यावसायिक स्टॉलसाठी क्रॉस मैदानाचा वापर करण्यास परवानगी नाकारली.
केवळ या क्रॉस मैदानावर सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यास मात्र खंडपीठाने परवानगी दिली आहे. तसेच येथे होणारे मनोरंजनात्मक आणि सामाजिक कार्यक्रम हे सर्व सामान्यांसाठी खुले ठेवण्यात यावेत, त्यासाठी कोणताही व्यावसायिक शुल्क आकारण्यात येऊ नये. असेही स्पष्ट केले.