कराड -ओगलेवाडी पोलिस दूरक्षेत्र इमारतीची दुरावस्था गैरसोयीची व अडचणीची झाली आहे. नवीन स्वतंत्र पोलिस ठाणे होण्याची परिसरातील लोकांची अनेक वर्षांची शासनाकडे मागणी आहे.
त्या दृष्टीने सहकार, पणन व पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी पोलिस ठाण्यासाठी येथील नवीन जागेची पाहणी करून पोलिस खात्यास व हजारमाची ग्रामपंचायतीस नव्या जागेत स्वतंत्र पोलिस ठाण्याची इमारत उभारण्यात शासनास त्वरीत प्रस्ताव देण्यासंबंधीत सुचना केल्या आहेत.
त्यासाठी आपण पाठपुरावा करणार असल्याची ग्वाही त्यांनी ग्रामस्थ व कार्यकर्त्याना दिली आहे. त्याप्रसंगी हजारमाची ग्रामपंचायतीचे सरपंच विद्या घबाडे व उपसरपंच प्रशांत यादव, ग्रांमपंचायत सदस्य, सहाय्यक पोलिस निरीक्षक विजय गोडसे, ग्रामस्थ व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.
परिसराचे विस्तारीकरण व गुन्हेगारीचे वाढते प्रमाण लक्षात घेता शासनाने येथील पोलिस दूरक्षेत्रास पोलिस ठाण्याचा स्वतंत्र दर्जा देण्याची व नवीन स्वतःची इमारत उभारण्याची लोकांची मागणी आहे. ब्रिटीश काळात कराड रेल्वे स्थानकाच्या जवळ पुर्वी अनेक वर्षे आऊट पोस्ट होते. ते गावाच्या बाहेर असल्याने लोकांच्या गैरसोयीचे होते. लोकांच्या मागणीमुळे 1998 च्या सुमारास ते गावाच्या मध्यभागी खासगी जागेत आले. मात्र आता पोलिस ठाण्याच्या या इमारतीची दुरावस्था झाली आहे.
वीज, पाणी, स्वच्छतागृहाची गैरसोय आहे. पोलिसांना राहण्यास खोल्या नाहीत. औट पोस्टच्या कार्यक्षेत्रात चार माच्या, गोवारे, गजानन हौसिंग सोसायटी, विरवडे, बनवडी अशी गावे आहेत. या गावांची लोकसंख्या पन्नास हजारांच्यावर आहे. येवढी मोठी लोकसंख्येला त्या मानाने पोलीस कर्मचारी वर्ग अपुरा आहे.
परिसरात रेल्वेस्थानक, शाळा, वीज वितरण कार्यालय, टेंभू प्रकल्प कार्यालय, औद्योगिक वसाहत, बाजारपेठ, गावाजवळ शामगाव व सुर्ली घाट आहे. येथील मुख्य रस्ता गुहागर-विजापूर राष्ट्रीय महामार्ग आहे. त्यामुळे पोलिस ठाण्यास महत्व आहे.
ओगलेवाडी दूरक्षेत्रातील पोलिसांचा कामांचा व्याप व ताण व तेथिल लोकसंख्या लक्षात घेता स्वतंत्र पोलिस ठाणे व नवीन सुसज्ज इमारतीची गरज असल्याचे येथे प्रकर्षाने जाणवते. त्यामुळे लवकरता लवकर येथे नवीन इमारत होणे गरजेचे आहे.
स्वतंत्र पोलीस ठाणे आवश्यक
गावाजवळ हजारमाची येथे चाळीस एकरात सुमारे 500 कोटीं रुपयांचे जागतिक पातळीवरील भूकंप संशोधन केंद्र व विद्यापीठ होत आहे. त्या पार्श्वभूमीवर शासनाने सध्याच्या पोलिस औट पोस्टचे स्वतंत्र पोलिस ठाणे व त्याची नवीन सुसज्ज सोयीने युक्त इमारतीची आवश्यकता असल्याचे ग्रामस्थांनी सांगीतले.