#Tokyo : खेळाडूंना विलगीकरणात सवलत

ऑलिम्पिक तयारीची आयोजकांकडून पाहणी

टोकियो – जपानमध्ये पुढील वर्षी होत असलेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत स्थानिक तसेच परदेशी खेळाडूंना करोनाच्या पार्श्‍वभूमीवर विलगीकरण कालावधीत सवलत देण्यात येणार आहे. जपान सरकारचे सदस्य, जपान ऑलिम्पिक संघटनेचे पदाधिकारी व आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक संघटनेचे सदस्य यांनी स्पर्धेच्या तयारीची पाहणी केली. 

ही स्पर्धा पुढील वर्षी 23 जुलै ते 8 ऑगस्ट या कालावधीत होत आहे. स्पर्धेत सहभागी होत असलेल्या खेळाडूंना करोनाच्या जागतिक नियमानुसार 14 दिवस विलगीकरणात राहण्याची आवश्‍यकता नाही. ज्या देशांत करोनाचा धोका कायम असेल किंवा वाढलेला असेल तर त्याच खेळाडूंसाठी 14 दिवसांचा कालावधी अत्यावश्‍यक असेल. मात्र, ज्या देशात करोनाचा धोका फारसा नाही तसेच संपुष्टात आला असेल त्यांना या कालावधीत सवलत देण्यात येणार असल्याचे जपान संघटनेने सांगितले आहे.

जपानमध्ये दाखल होण्यापूर्वी 72 तासांत खेळाडूंची कोरोना चाचणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच जपानमध्ये दाखल झाल्यावरही त्यांना चाचणी द्यावी लागणार आहे. जपानबाहेरच्या खेळाडूंसाठी जरी अद्याप कोणतेही निर्णय जाहीर करण्यात आले नसले तरीही विलगीकरणातील सवलती व्यतरिक्‍त अन्य ठिकाणी त्यांना नियमांचे पालन करावे लागणार आहे. खेळाडू, प्रशिक्षक व स्पर्धेशी संबंधित अधिकाऱ्यांना दाखल झाल्यावर चाचणी तर द्यावीच लागेल मात्र, बायो बबलमध्ये त्यांचा प्रवेश देण्यात येणार आहे.

प्रेक्षकांबाबतचा निर्णय लांबणीवर

जपानमध्ये गेल्या महिन्यात झालेल्या जिम्नॅस्टिक्‍स स्पर्धेत प्रेक्षकांना ठराविक संख्येने प्रवेश देण्यात आला होता. याच धर्तीवर ऑलिम्पिक स्पर्धेतही प्रवेश देण्याबाबत विचार सुरू आहे. मात्र, त्यावेळच्या परिस्थितीचा आढावा घेऊनच त्याबाबत निर्णय घेतला जाणार आहे, असे जपान संघटनेने सांगितले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.