नवी दिल्ली : करोनाच्या नव्या व्हेरियंट ओमायक्रॉनने देशात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या नव्या व्हेरियंटला नियंत्रित करण्यासाठी देशात जास्तीत जास्त लसीकरणावर सरकारकडून भर देण्यात येत आहे. तर दुसरीकडे, देशाच्या करोना कृतिदलाचे प्रमुख आणि निती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल यांनी केलेल्या विधानामुळे चिंतेतच भर टाकली आहे.
व्ही.के.पॉल यांनी मंगळवारी सांगितले की, नव्या ओमयाक्रॉन व्हेरिएंटवर आपली करोनावरील लस कुचकामी ठरण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता चिंतेत वाढ झाली आहे. याआधी वाढत्या रुग्णसंख्येबाबत डॉ. व्ही. के. पॉल यांनी धोक्याचा इशारा दिला होता. लोकांच्या बेपर्वाईवर बोट ठेवत डॉ. पॉल यांनी आपण जोखीम पत्करत आहोत, अशी चिंता व्यक्त केली होती.
आपल्या लसी उदयोन्मुख परिस्थितीत कुचकामी ठरण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे करोनाच्या नवीन प्रकाराला तोंड देण्यासाठी संघटित होऊन लस तयार करण्याची गरज आहे. औषधांच्या विकासात ठोस दृष्टिकोनाची गरज आहे, असे डॉ. व्ही. के. पॉल यांनी म्हटले. “गेल्या तीन आठवड्यांपासून मी ओमायक्रॉनच्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर, अशा शंका कशा समोर आल्या आहेत हे आम्ही पाहिले आहे. त्यापैकी काही खऱ्या असू शकतात. आपल्याकडे अद्याप अंतिम चित्र स्पष्ट नाही,” असेही पॉल म्हणाले.
पॉल म्हणाले की, सध्याचे प्राधान्य हे सर्वांना लस मिळण्याचे आहे आणि कोणीही मागे राहणार नाही. साथीच्या रोगाचा सामना करण्यासाठी विज्ञानात गुंतवणूक करण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली. एका इंग्रजी वर्तमानपत्रानुसार, पॉल म्हणाले की, सध्या ही लस जगापर्यंत पोहोचावी आणि कोणीही मागे राहू नये, हीच प्राथमिकता आहे. महामारीचा सामना करण्यासाठी विज्ञानातील गुंतवणुकीवरही भर देण्याची गरज असल्याचे ते म्हणाले. सीआयआय पार्टनरशिप समिटमध्ये पॉल बोलत होते.
याआधी आपण आता जोखमीच्या परिस्थितीत वावरत आहोत. देश धोकादायक क्षेत्रामध्ये आहे. मुखपट्टीचा वापर कमी झाला आहे. मुखपट्टीचा वापर आणि लसीकरण किती महत्त्वाचे आहे, हे आपण लक्षात घेतले पाहिजे, असे डॉ. पॉल म्हणाले. जगभरातील ओमायक्रॉन प्रादुर्भावाच्या परिस्थितीतून आपण धडा घेणे आवश्यक आहे. नव्या विषाणूने जागतिक चिंतेत भर घातली आहे. जागतिक आरोग्य संघटनेनेही मुखपट्टी आणि लसीकरणाचा आग्रह धरला आहे. या दोन्ही गोष्टींकडे आपणही दुर्लक्ष करू नये, असे डॉ. पॉल यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, भारतातील ओमिक्रॉनच्या रुग्णांची संख्या आता ६१ वर पोहोचली आहे. त्याच वेळी, ब्रिटनमध्येही ओमायक्रॉनचा वेगाने प्रसार होत आहे. जानेवारीपासून ब्रिटनमध्ये सर्वाधिक नवीन कोविड प्रकरणे नोंदली गेली आहेत. एकट्या ब्रिटनमध्ये ओमायक्रॉनची प्रकाराची ५ हजार प्रकरणे समोर आली आहेत.