साद-पडसाद: चिंता अफवांधारित समूहहिंसेची…

अ‍ॅड. अतुल रेंदाळे

देशातील विविध भागांमध्ये मुलं पळवणारी लोक म्हणून गर्दीने निरपराध लोकांवर हल्ले करण्याच्या घटना एकामागोमाग एक समोर येत आहेत. एका अंदाजानुसार गेल्या तीन वर्षांमध्ये गर्दीने मुले चोरतात या संशयावरून 50 हून अधिक लोकांची हत्या केली आहे. प्रगत समाजाला अशोभनीय ठरणाऱ्या या घटना रोखणे हे कायदा व्यवस्थेपुढे आणि समाजव्यवस्थेपुढेही एक मोठे आव्हान आहे.

मुले चोरणारी लोकं किंवा टोळी म्हणून निरपराध लोकांवर हल्ला करण्याचे प्रमाण अचानक वाढले आहे. गेल्या काही दिवसांत असे हल्ले अधिक प्रमाणात घडत असल्याचे दिसून आले आहे. काही दिवसांपूर्वी दिल्लीतील हर्ष विहार या परिसरात एका मूकबधिर गर्भवती महिलेला जमावाने मुलं पळवणारी महिला म्हणून इतके मारले की ती मरता मरता बचावली. गाझियाबादमध्ये एक ज्येष्ठ महिला आपल्या कुशीत आपल्या नातवाला घेऊन चालली होती तेव्हा ती मुलं पळवणारी बाई आहे, असा संशय घेत तिला अर्धमेली होईपर्यंत मारले होते. तर संभलमध्येही आपल्या भाच्याला रुग्णालयात घेऊन जाणाऱ्या एका व्यक्‍तीवरही असाच संशयातून हल्ला केला होता. रेवाडीमध्ये मुलाच्या मामावर संशयाने हल्ला केला होता. गेल्या काही वर्षांमध्ये अशा प्रकारच्या अनेक घटना समोर आल्या आहेत मात्र, अधूनमधून या घटनांची तीव्रता मोठ्या प्रमाणावर वाढली आहे.

गेल्या तीन वर्षांत मुलं पळवण्याच्या संशयावरून 50 हून अधिक लोकांना गर्दीच्या हल्ल्याला तोंड देताना आपले जीव गमवावे लागले असावेत असा एक अंदाज वर्तवला जात आहे. अर्थात मारणाऱ्या गर्दीला कोणाचे मूल आणि कुठून पळवले आहे हे अजिबात माहीत नसते. त्याविषयी माहिती घ्यावी असा प्रयत्नही कोणी करताना दिसत नाही. फक्‍त मूल चोरी झाले अशी बोंब ठोकली जाते आणि सगळेजण आक्रमक होतात. भीतीपोटी अनेक ठिकाणी लोकांनी आपल्या मुलांना शाळेत पाठवणेही बंद केले आहे. या भीतीपोटी शाळेत न पाठवल्याने ग्रामीण भागातील प्राथमिक विद्यालयातील लहान लहान वर्गही विद्यार्थ्यांविना रिकामे दिसू लागले आहेत. लहान मुले पळवली आहेत, या घटनांमागे एकसारखेपणा दिसतो. एखाद्या परिसरात एक व्हॉटसऍप मेसेज येतो, तो व्हायरल होतो. त्यामध्ये मुलं पळवणारी टोळी त्या भागात कार्यरत असल्याचे सांगितले जाते. त्यात मुलांना पळवून त्यांचे अवयव विकले जात असल्याचे किंवा लहानग्यांचे लैंगिक शोषण होत असल्याचे सांगितलेले असते.

बरं हा नुसता लिखित मेसेज नसतो तर तो प्रामाणिक वाटावा म्हणून त्याबरोबर एक व्हिडिओ देखील दाखवला जातो. त्यात पाकिस्तानात आणि बांगलादेशात मुलं पळवणे थांबवण्यासाठी तयार केलेली लहानशी फिल्म असते. पण ही फिल्म मोडतोड करून पुढे पसरवली जाते. परिणामी असामाजिक घटक किंवा दंडेलशाही करणाऱ्या व्यक्‍ती एखाद्या घाबरलेल्या व्यक्‍तीला किंवा मानसिक कमजोर असलेल्या व्यक्‍तीलाही मुलं पळवणारी व्यक्‍ती म्हणत त्यांच्यावर हल्ला करतात. वास्तविक लोक वैयक्‍तिक पातळीवर कायद्याला घाबरून असतात, राहतात. पण गर्दीचा एक भाग झाल्यानंतर मात्र कायदा आपल्याच खिशात असल्यासारखे वागतात. समूहात मिसळून एखादे गैरकृत्य केले तर त्याची काही शिक्षा होणार नाही असे या लोकांना वाटते. त्यामुळे ते बिनधास्त बेकायदेशीर कृत्य करतात.

दुसरी गोष्ट म्हणजे मुलं पळवत असल्याची अफवा किंवा समजूत पसरल्याने समाजात एक प्रकारे भीतीचे वातावरण तयार होते आणि त्याचे परिवर्तन सामूहिक हिंसेच्या रूपात होते. त्यामुळेच प्रशासनाने आपल्या धोरणांमध्ये तत्काळ या गोष्टींवर कारवाई करण्याविषयी विचार केला पाहिजे. पहिली गोष्ट म्हणजे मुले पळवणे आणि त्याच्याशी निगडीत अफवा या दोन्हीवर एकाच वेळी सक्‍तीने कारवाई केली पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे या अफवांचे पीक रोखण्यासाठी, या कामासाठी समाज माध्यमांचा वापर करणाऱ्या लोकांवर कडक कारवाई केली पाहिजे जेणेकरून त्यांना दीर्घकाळ त्याचा पश्‍चाताप होईल. अर्थात यामध्ये प्रशासन एकटे काहीच करू शकणार नाही. त्यासाठी गरज आहे ती समाजाने जागरूक राहण्याची. जेव्हा सर्वसामान्य लोक सजग राहतील आणि खोडसाळ वृत्तीच्या लोकांच्या हातचे खेळणे होणार नाहीत तेव्हाच प्रशासनाच्या ह्या अफवा पसरवणाऱ्या खोडसाळ लोकांना रोखण्याच्या प्रयत्नांना यश येईल.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here