कॉम्प्युटर टायपिंगचा 47.59 टक्‍के निकाल

संकेतस्थळावर निकाल उपलब्ध

पुणे  – महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेण्यात आलेल्या स्पेशल स्किल इन कॉम्प्युटर टायपिंग फॉर इन्स्ट्रक्‍टर अँड स्टुडंटस परीक्षेचा निकाल 47.59 टक्‍के लागला आहे. राज्यातील एकूण 35 केंद्रावर 25 जानेवारीला ही परीक्षा घेण्यात आली होती. परीक्षेचा निकाल नुकताच लागला आहे. परीक्षा परिषदेच्या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांसाठी हा निकाल उपलब्ध करून देण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना गुणपत्रिकांची ऑनलाईन प्रिंट घेता येणार आहे. परीक्षेसाठी 906 विद्यार्थ्यांनी अर्ज भरले होते. यातील 708 विद्यार्थी उपस्थित तर अनुपस्थित 198 होते. यात 276 विद्यार्थी उत्तीर्ण तर 95 विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले. पूर्व अटीची पूर्तता न करणाऱ्या 95 विद्यार्थ्यांचे निकाल राखीव ठेवण्यात आले आहेत, अशी माहिती राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्‍त तुकाराम सुपे यांनी दिली आहे.

विद्यार्थ्यांची गुणपत्रके व निकालाच्या प्रती सर्व जिल्ह्यांच्या जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी व मुंबई विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयामार्फत संबंधित संगणक टंकलेखन संस्थांना वितरित करण्यात येणार आहेत. विद्यार्थ्यांना त्याची गुणपत्रके संगणक टंकलेखन संस्थांमधून कार्यालयीन वेळेत मिळणार आहेत. गुणपडताळणी व उत्तरपत्रिकेच्या छायांकित प्रतीसाठी निकाल जाहीर झालेल्या दिनाकांपासून दहा दिवसांत परीक्षार्थीने संस्थेतून ऑनलाइन अर्ज दाखल करणे आवश्‍यक आहे. गुणपडताळणीसाठी प्रति विषय 100 रुपये व उत्तरपत्रिका छायाप्रती मिळविण्यासाठी प्रति विषय 400 रुपये शुल्क येत्या दि. 6 मेपर्यंत भरावे लागणार आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.