- मृत्यू झालेल्याच्या कुटुंबियांना मिळणार 14 लाख
- लॉकडाऊनमुळे कुटुंबियांची होत होती परवड
पुणे(प्रतिनिधी) – मृत्यू झालेल्या तरूणाच्या कुटुंबियांना असलेली पैशाची गरज, वकिलांनी केलेला प्रयत्न आणि विमा कंपनीने दिलेल्या सकारात्मक प्रतिसादामुळे येथील न्यायालयात लॉकडाऊनच्या काळातही मोटार अपघात न्यायप्राधिकरणाच्या (एमएसीटी) प्रकरणात तडजोड झाली आहे. मृत्यू झालेल्या तरूणाच्या कुटुंबियांना 14 लाख रुपये देण्याचे मान्य करण्यात आले आहे. मोटार अपघात न्यायप्राधिकरणाचे सदस्य व्ही.आर. जगदाळे यांच्या न्यायालयात हा निकाल झाला.
हुसेन काशिम मोमीन (वय 22) असे अपघातात मृत्यू झालेल्याचे नाव आहे. त्याच्या कुटुंबियांच्या वतीने अॅड. अनिरूध्द पायगुडे आणि अॅड. धौर्यशील पाटील यांनी नुकसान भरपाई मिळावी, यासाठी येथील मोटार अपघात न्यायप्राधिकरण येथे 19 सप्टेंबर 2019 रोजी दावा दाखल केला होता.
हुसेन 26 सप्टेंबर 2018 रोजी कोंढव्यावरून कात्रजकडे दुचाकीवरून चालला होता. त्यावेळी पाठीमागून आलेल्या ट्रेलरने दुचाकीला धडक दिली. त्या अपघातात त्याचा मृत्यू झाला. या पार्श्वभूमीवर 19 सप्टेंबर 2019 रोजी फ्युचर जनरल इन्शुरन्स कंपनीच्या विरोधात हा दावा दाखल करण्यात आला होता.
हुसेन (वय 22) हा घरात एकटाच कमविता होता. तो एका कंपनीत कामाला होता. आई-वडिल, दोन भाऊ आणि बहिण असा त्याचा परिवार होता. दरम्यान, करोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन सुरू असून, न्यायालयाचे कामकाज बंद आहे. मात्र, हुसेन याच्या कुटुंबियांना पैशाची गरज होती. या पार्श्वभूमीवर ही तडजोड झाली. विमा कंपनीचे वकील सुनील द्रविड आणि विधी अधिकारी म्हणून संतोष मोरे यांनी काम पाहिले.