अहवाल आल्यावर दोन दिवसांत सर्वंकष मदत – उद्धव ठाकरे

चिपळूण – पुरामुळे शेती, घरे आणि दुकानांचे अतोनात नुकसान झाले आहे. त्या सर्वांना तातडीने मदत केली जाईल. माझ्याकडे दोन-चार दिवसांत आर्थिक नुकसानीचा अहवाल येणार आहे. अहवाल आल्यावर सर्वंकष मदत केली जाईल, असे सांगतानाच सवंग लोकप्रियतेसाठी कोणतीही घोषणा करणार नाही. कुणालाही वाऱ्यावर सोडणार नाही, असे आश्‍वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दिले.

चिपळूणमधील पूरपरिस्थितीची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज पाहणी केली. यावेळी त्यांनी व्यापाऱ्यांशी चर्चा केली. त्यानंतर पत्रकार परिषद घेऊन त्यांनी ही माहिती दिली.
उद्धव ठाकरे म्हणाले, आपण हवामान बदल हा शब्द ऐकून होतो, आता त्याचा फटका बसू लागला आहे. काल मी तळीये गावात गेलो होतो.

दरडी कोसळायला लागल्या आहेत. वर्षानुवर्षे असलेल्या गावांवर दरडी कोसळत आहेत. क्षणार्धात या दरडीखाली लोक दबून जात आहे. आताचा पाऊस पडला त्याला अतिवृष्टी म्हणता येत नाही. हा भयानक पाऊस होता. हे आता सातत्याने होत आहे. पावसाची सुरुवात चक्रीवादळाने होत असते. नंतर अचानक कुठे तरी ढगफुटी होते. पूर येतो. जीवितहानी होते. पिकांचे नुकसान होते. विध्वंस होतो सगळीकडे. हे दरवर्षी होत आहे, असे ते म्हणाले.

केवळ सवंग लोकप्रियता मिळवण्यासाठी मी आत्ता लगेच काहीतरी घोषणा करणार नाही, राज्यातील पूर परिस्थितीचा सर्वंकष आढावा घेऊन त्यानंतरच नुकसानभरपाई संदर्भामध्ये जाहीर करण्यात येईल. तसेच केंद्राकडून देखील काय आणि किती मदत मागायची ते ठरवता येईल, असे ते म्हणाले.

तत्काळ मदत केली जाईल. त्यांच्या अंगावर जेवढे कपडे आहेत तेवढेच कपडे त्यांच्याकडे आहेत. घरातील धनधान्य वाहून गेले आहेत. त्यामुळे त्यांना सर्वात आधी त्याबाबतची मदत दिली जाणार आहे. तिथे जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्त आहेत. त्यांना तशा सूचना दिलेल्या आहेत. सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, कोल्हापूर, सांगली, सातारा यांचा एकत्रिच आढावा घेऊन तात्काळ मदत घोषित करू, असेही त्यांनी सांगितले.

प्रत्येक जिल्ह्यात एनडीआरएफची टीम उभारणार
वारंवार येणारी संकटांची मालिका आणि संकटं बघितल्यानंतर आता प्रत्येक जिल्ह्यात एनडीआरएफ सारखी टीम उभारण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे. कारण बाहेरची टीम येईल तोपर्यंत स्थानिक टीम मदत कार्याला लागेल. काही ठिकाणी दरडी कोसळल्या त्याठिकाणी माणसं जाऊ शकत होती. पण यंत्रसामग्री नेणे कठीण होते. तिथे रस्तेच नव्हते. रस्ते साफ करुन तिथे यंत्रसामग्री पोहोचवण्याचा प्रयत्न केल्याने तिथे दुर्देवाने टीमला पोहोचायला वेळ लागला, असे त्यांनी स्पष्ट केले.

केंद्राकडे वस्तुस्थितीवर आधारीत मागणी करणार
दोन दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोन होता. त्यांनी एनडीआरएफ, आर्मी, नेव्ही, एअरफोर्स जे आवश्‍यक असेल ते सर्व देण्याचे आश्वासन दिले. आता दूरगामी योजना आपण लागू करणार आहोत त्यासाठी त्यांची मदत आपल्याला लागेल. करोनामुळे सर्वांची आर्थिक परिस्थिती आणि अर्थव्यवस्था मंदावलेली आहे. त्यामध्ये संकटातून संकट येत आहेत. या संकटसमयी केंद्राकडूनही मदत होत आहे. आपण वस्तुस्थितीवर आधारीत मागणी करू. सर्व परिस्थितीचा आढावा घेतल्यावर मागणी करु. पण आता तत्काळ महाराष्ट्र सरकारकडून जी मदत लागेल ती केली जाईल, असेही त्यांनी सांगितले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.