पिंपरी – राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह सुमारे 70 जणांवर इडीने गुन्हा दाखल केला आहे. याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने शुक्रवारी (दि. 27) महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. या बंदला पिंपरी चिंचवड शहरात संमिश्र प्रतिसाद मिळाला.
पिंपरी चिंचवड शहरातील पिंपरी कॅम्प, प्राधिकरण, पिंपळे सौदागर, सांगवी, नेहरुनगर, भोसरी, संत तुकाराम नगर आदी भागात स्थानिक कार्यकर्ते व नेत्यांनी परिसरात फिरून व्यापाऱ्यांना दुपारी दोन वाजेपर्यंत दुकाने बंद ठेवण्याचे आवाहन करीत होते. त्यास व्यापाऱ्यांकडून प्रतिसाद मिळत होता. तर शहराच्या काही भागात बंदला प्रतिसाद मिळाला नसल्याचेही दिसून आले.
पिंपरी चिंचवड शहराची मुख्य बाजारपेठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पिंपरी कॅम्प परिसरात राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील, नगरसेवक डब्बू आसवानी, नगरसेविका निकिता कदम आणि हरीश कदम यांनी कार्यकर्त्यांसह परिसरातील नागरिकांना बंदचे आवाहन केले. यामुळे दुपारी दोन वाजेपर्यंत दुकाने बंद होती.
याबाबत माहिती देताना राष्ट्रवादीचे युवक शहराध्यक्ष विशाल वाकडकर म्हणाले, सकाळी सुमारे 50 कार्यकर्त्यांसह डांगे चौक आणि आकुर्डी परिसरात व्यापाऱ्यांना आवाहन केले. त्यानंतर सहा वाहनांमधून मुंबईला रवाना झालो. मात्र वाशी टोल नाक्यावर आमची वाहने पोलिसांनी पकडली आणि आम्हाला ताब्यात घेतले. विरोधी पक्षनेते नाना काटे म्हणाले, कालच व्हिडिओ क्लीपच्या माध्यमातून व्यापाऱ्यांना बंदचे आवाहन केले होते. त्यानुसार परिसरात चांगला प्रतिसाद मिळाला. तसेच शुक्रवारीही परिसरातून फेरी काढत व्यापाऱ्यांनीही शरद पवार यांना पाठिंबा व्यक्त केला.
पिंपळे गुरव, रावेत परिसरात बंदला 100 टक्के यश मिळाल्याचा दावा माजी नगरसेवक राजेंद्र जगताप, नगरसेवक मोरेश्वर भोंडवे यांनी केला आहे. तर आकुर्डी परिसरात व्यापाऱ्यांनी स्वतःहून दुकाने बंद ठेवल्याची माहिती नगरसेवक जावेद शेख यांनी दिली.
माजी विरोधी पक्षनेते दत्ता साने म्हणाले, “”मी एकदिवस अगोदर व्यापाऱ्यांची बैठक घेतली होती. यामुळे शुक्रवारी बंदचे आवाहन करण्यासाठी फेरी काढण्याची गरज पडली नाही. तसेच मी दुपारपर्यंत कार्यकर्त्यांसह चौकात थांबलेलो होतो. पिंपरीतील संत तुकाराम नगर परिसरातही बंदला मोठा प्रतिसाद मिळाला. माजी महापौर योगेश बहल, सुलक्षणा धर, फजल शेख यांनी व्यापाऱ्यांना बंदचे आवाहन केले. प्राधिकरणातही बंदला प्रतिसाद मिळाल्याचे माजी उपमहापौर राजू मिसाळ यांनी सांगितले. रुपीनगर, त्रिवेणी या भागातील व्यापाऱ्यांना आवाहन करण्यासाठी नगसेवक पंकज भालेकर, प्रविण भालेकर, संगीता ताम्हाणे आणि पौर्णिमा सोनावणे यांनी फेरी काढून व्यापाऱ्याना केलेल्या आवाहनास मोठा प्रतिसाद मिळाला.
शरद पवारा्ंवरील कारवाई चुकीची – भोंडवे
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर राजकीय सूडबुद्धीने ही कारवाई करण्यात आली आहे. पवार हे सर्वसामान्यांचे नेते असून विधानसभा निवडणुकीत भाजपा सेनेला पवार हेच धक्का देवू शकतात, याची खात्री पटल्यानेच ही कारवाई करण्यात आली. यापुढेही राष्ट्रवादीच्या माध्यमातून आम्ही आंदोलन चालूच ठेवणार असून निवडणुकीत जनताही सत्ताधाऱ्यांना धडा शिकवेल, असा विश्वास नगरसेवक मोरेश्वर भोंडवे यांनी व्यक्त केला.
शहरवासिय पवारांसोबत – शेखर ओव्हाळ
पिंपरी-चिंचवड शहरातील जनता सुज्ञ असून त्यांना खरे आणि खोटे यातील फरक कळतो. आजच्या बंदमध्ये नागरिकांनी शरद पवार यांना पाठिंबा दर्शविण्यासाठी उत्स्फुर्त सहभाग नोंदविला. यावरूनच शहरातील जनता शरद पवार यांच्यासोबत असल्याचेच सिद्ध झाले आहे. सत्ताधाऱ्यांनी राजकीय हेतूने केलेल्या कारवाईचे उट्टे जनतेनेच काढायचे ठरविले आहे. त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीत त्याचा परिणाम सत्ताधाऱ्यांना भोगावा लागेल.