विजय केळकर : सर्व वस्तूंसाठी एकच 10 टक्के दर असावा
करसंकलन वाढेल; करचुकवेगीरी टळेल
पुणे – जीएसटीचे सुरुवातीला अनेक टप्पे होते. आता 4 टप्पे आहेत. त्याचबरोबर अनेकवेळा जीएसटीच्या दरांमध्ये बदल करण्यात आले आहेत. त्यामुळे उत्पादक आणि व्यापारी गोंधळून गेले आहेत. परिणामी जीएसटी संकलनात घट होऊन असमाधानाचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे सर्व वस्तूंसाठी केवळ एकच 10 टक्के जीएसटी असावा, असा उपाय वित्त आयोगाचे माजी अध्यक्ष विजय केळकर यांनी सूचविला आहे.
या विषयावर 2004 मध्ये केळकर यांच्या नेतृत्वाखाली एक कृती गट केला होता. या गटाने जीएसटी सुरू करण्याबाबत शिफारस केली होती. त्यानंतर 12 वर्षे विषयावर राजकीय पक्षात मतेक्य होऊ शकले नव्हते. दोन वर्षांपूर्वी जीएसटी अमलात आणण्यात आला. मात्र, त्याच्या अंमलबजावणीवरून देशभर नकारात्मक वातावरण निर्माण झालेले आहे. यावर केळकर यांनी आता “इन सर्विस ऑफ रिपब्लिक’ नावाचे पुस्तक लिहिले आहे.
जर केवळ एक टप्पा म्हणजे 10 टक्के जीएसटी ठेवला तर, त्यामुळे अधिकाऱ्यांना कर संकलन सोपे जाणार आहे. त्याचबरोबर करचुकवेगिरी कमी होणार आहे, असे केळकर यांना वाटते. सुरुवातीला अर्थव्यवस्थेचा वेग वाढविण्यासाठी जीएसटीचे दर कमी केले. मात्र, आता संकलन अपेक्षेपेक्षा फारच कमी झाल्यामुळे राज्य आणि केंद्र सरकारसमोर तूट निर्माण होण्याचा प्रश्न निर्माण झाला. राज्यांनी केंद्र सरकारकडे नुकसानभरपाईची मागणी केली आहे. त्यामुळे आगामी जीएसटी परिषदेत कराचे टप्पे कमी करण्याबाबत आणि करांचे दर वाढविण्याबाबत विचार केला जाणार आहे. सध्या काही वस्तूंवर 0% कर आहे तर, इतर वस्तूंवर 5 टक्के, 12 टक्के, 18 टक्के व 20 टक्के असे करांचे दर आहेत. म्हणजे परिणामकारकरित्या चार दर आहेत. त्यामुळे कर संकलन अधिकारी आणि कर देणारे गोंधळून जातात. त्याचबरोबर यातून करचुकवेगिरीचे अनेक प्रकार घडून येतात. त्यामुळे फक्त 10 टक्के हा एकच कर असावा असे केळकर यांनी म्हटले आहे.