कराड – रमजान या मुस्लीम बांधवांच्या पवित्र सणानिमित्त येथील प्रसिद्ध जामा मशिदीपासून सकाळी 8.30 वाजता असंख्य मुस्लीम मान्यवरांच्या उपस्थितीत जुलूस काढण्यात आला. जामा मशिदीपासून मुख्य रस्त्याने नेहरू चौक, सात शहीद चौक, आझाद चौक, यशवंत हायस्कूल, हेड पोस्ट, बापूजी साळुंखे पुतळ्याजवळून बस स्थानक परिसर, विजय दिवस चौकातून इदगाह मैदानात आणण्यात आली. इदगाह मैदानावर कराड शहर, परिसर व संपूर्ण तालुक्यातून सुमारे पाच हजार मुस्लीम बांधवांनी शाही इमामांच्या मार्गदर्शनाखाली सामूहिक नमाज पठण केले. त्यानंतर मुस्लीम बांधवांनी एकमेकांची गळाभेट घेऊन शुभेच्छा दिल्या.
त्यानंतर खा. उदयनराजे भोसले यांनी प्रत्यक्ष भेटून मुस्लीम बांधवांना शुभेच्छा दिल्या. यावेळी प्रांताधिकारी हिंमत खराडे, उपविभागीय पोलीस अधिकारी नवनाथ ढवळे, पोलीस निरीक्षक ज्योतिराम पाटील यांनी समस्त मुस्लीम बांधवांना गुलाबपुष्प देऊन रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्या.
रमजानच्या पवित्र सणाच्या निमित्ताने मुस्लीम बांधवांचे गेल्या अनेक दिवसांपासूनचे उपवासाचे पदार्थ, कपडे, भेटवस्तू आणि इतर अन्य खरेदीसाठी बाजारपेठेत मोठी गर्दी दिसून आली. यावेळी त्यांचा विशेषतः लहान मुलांचा खरेदीचा उत्साह दिसून आला. चंद्रदर्शन झाल्यानंतर मुस्लीम बांधवांनी ईदचा उपवास सोडला. त्यानंतर एकमेकांना शिरखुर्मा देऊन आनंद साजरा केला. कराड, परिसर व तालुक्यात रमजान ईदनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.