गुंतागुंतीची हृदय शस्त्रक्रिया यशस्वी

दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील डॉ. धैर्यशील कणसे यांची माहिती

पुणे – गर्भवती महिलेची प्रसुती त्यानंतर तिची अतिशय गुंतागुंतीची असलेली हृदयातील महाधमनीची आर्च रिप्लेसमेंट शस्त्रक्रिया, त्यानंतर अतिदक्षता विभागात “रिकव्हर’ होत असताना झालेली करोनाची लागण या सगळ्या दिव्यांमधून महिलेला सुखरूप जीवनदान देण्याची किमया दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील हृदयरोग सर्जन डॉ. धैर्यशील कणसे आणि त्यांच्यासह अन्य तज्ज्ञ डॉक्‍टरांनी करून दाखवली आहे. ही शस्त्रक्रिया ऑक्‍टोबरमध्ये करण्यात आली होती.

अशाप्रकारची हृदयाची “फ्रोजन एलिफंट ट्रंक’ ही शस्त्रक्रिया पहिल्यांदाच महाराष्ट्रात तेही दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने केल्याचा दावा करण्यात आला आहे. चेन्नई, दिल्ली येथील रुग्णालयांमध्ये अशाप्रकारच्या रोगांवरील शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. मात्र, या रुग्णाबाबत ती गर्भवती असल्यामुळे अधिक धोका होता. प्रयत्नांची पराकाष्ठा आणि योग्य नियोजनाची जोड देऊन ही शस्त्रक्रिया यशस्वी करण्यात आल्याचे डॉ. कणसे यांनी सांगितले.

संबंधित महिलेची 10 वर्षांपूर्वी “ओपन हार्ट’ शस्त्रक्रिया झाली होती. त्यावेळी त्यांना “वॉल्व्ह’ बसवले होते. तिच्या लग्नानंतर सर्जन तसेच कार्डिओलॉजिस्टच्या सल्ल्यावरून तिने गर्भधारणेचा निर्णय घेतला. गर्भधारणा झाल्यानंतर ती नियमितपणे इको कार्डियोग्राफी (हृदयाच्या सोनोग्राफी) करत होती.

मात्र, तिच्या गर्भधारणेच्या 30 व्या आठवड्यात “इकोकार्डिओग्राफी’ चाचणीत तिच्या हृदयाच्या धमनीजवळ “एओर्टीक एन्यूरिझम’ नावाची एक दुर्मिळ स्थिती म्हणजे फुगवटा असल्याचे निदान केले. तसेच, तिला अंतर्गत संसर्गही झाला होता. त्यामुळे तिच्या आणि पर्यायाने बाळाच्या जीवालाही धोका होता. अशा परिस्थितीत रुग्ण दगावणे, स्ट्रोक, मूत्रपिंड निकामी होणे, हृदयविकाराचा झटका अशी कोणतीही स्थिती उद्‌भवू शकली असती.

त्यासाठी या महिलेची “फ्रोजन एलिफंट ट्रंक’ या सह संपूर्ण “एऑर्टिक आर्च रिप्लेसमेंट’ शस्त्रक्रिया करणे आवश्‍यक होते. यामध्ये रूग्णातील चढत्या धमनीचा आकार वाढला होता आणि तिचे पूर्वीचे ऑपरेशनही उसवले होते; ज्यामुळे धमनीच्या झडपांवर परिणाम झाला होता. म्हणून, महाधमनी शिवाय वॉल्व्हचा भाग बदलणे आवश्‍यक असल्याने ही शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतल्याचे डॉ. कणसे यांनी नमूद केले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.