पुणे – 2 हजार 688 शाळांची पडताळणी पूर्ण

‘आरटीई’ प्रवेश : तांत्रिक अडचणींमुळे 847 शाळा अद्याप पोर्टलवर

पुणे – बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षण कायद्यानुसार “आरटीई’च्या 25 टक्‍के प्रवेशाच्या केवळ 2 हजार 688 शाळांची पडताळणी प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. तांत्रिक अडचणींमुळे 847 शाळा अद्याप पडताळणीसाठी पोर्टलवर पुढे सरकू शकल्या नाहीत.

खासगी विनाअनुदानित शाळांमध्ये “आरटीई’ अंतर्गत विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. दरवर्षी यासाठी वेळापत्रक निश्‍चित केले जाते. प्रत्यक्षात मात्र याची व्यवस्थित अंमलबजावणीच होत नाही असे स्पष्ट होऊ लागले आहे. राज्यात एकूण “आरटीई’च्या 15 हजार 371 शाळा आहेत. मात्र, यातील 5 हजार 767 शाळांना प्रवेशाच्या कोट्यातून वगळले आहे. यात प्रामुख्याने अल्पसंख्यांक व्यवस्थापन, संस्कृत पाठशाळा, मदरसा, विनामान्यता, माध्यमिक, महाविद्यालय, बंद शाळा, बोर्डींग स्कूल, विशेष शाळा, अनधिकृत व्यवस्थापन, अनुदानित शाळा आदींचा समावेश आहे.

राज्यात “आरटीई’ प्रवेशासाठी एकूण 9 हजार 604 शाळा पात्र ठरविण्यात आल्या आहेत. यात यंदा नव्याने 851 शाळांची नोंदणीही झाली आहे. पुण्यात सर्वाधिक 993 तर सर्वात कमी 47 शाळा सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहेत.

“आरटीई’ पोर्टलवर ऑनलाइन नोंदणीत अडचणी येत असल्याने काही शाळांना नोंदणीत पुढे सरकण्यात अडचणी निर्माण झाल्या आहेत. एकूण 6 हजार 704 शाळांची नोंदणीनंतर पडताळणी पूर्ण झाली नाही. उर्वरित काही शाळांची पडताळणी पूर्ण झाली आहे. यात पुण्यातील 101, परभणीतील 114, नाशिकमधील 208, अहमदनगरमधील 207, ठाण्यातील 124 शाळांची पडताळणी करण्यात आली आहे. पोर्टलवर शाळांची नोंदणी करण्यासाठी व त्यांची पडताळणी करण्याकरिता गुरुवारी मुदत संपणार आहे. यानंतर पालकांना अर्ज भरण्यासाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे, अशी माहिती प्राथमिक शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी दिली.

सुरळीत प्रवेशाठी विशेष अधिकाऱ्यांची नेमणूक
शाळांनी सरल प्रणालीवर ऑनलाइन भरलेल्या माहितीनुसार यंदा शाळांमध्ये प्रवेशांच्या जागा निश्‍चित करण्यात येणार आहेत. गेल्या अनेक वर्षांत प्रवेशासाठी शाळांनाच सर्व अधिकार देण्यात आले होते. मात्र, बहुसंख्य शाळा मनमानी करत असल्याच्या तक्रारी पालकांकडून दाखल झाल्या होत्या. त्यामुळे यंदापासून नोंदणीकृत शाळांच्या पडताळणीबरोबरच सर्वच प्रवेश प्रक्रिया सुरळीत होण्यासाठी विशेष अधिकाऱ्यांचा समावेश असलेल्या स्थानिक पातळीवर समित्या नेमण्यात आल्या आहेत. या समितीचे प्रक्रियेवर कठोर नियंत्रण राहणार आहे.

जिल्हानिहाय प्रवेशासाठी पात्र शाळा
अहमदनगर 405, अकोला 209, औंरगाबाद 659, अमरावती 250, भंडारा 96, बीड 220, बुलढाणा 231, चंद्रपूर 191, धुळे 100, गडचिरोली 85, गोंदीया 145, हिंगोली 73, जळगाव 296, जालना 297, कोल्हापूर 355, लातूर 246, मुंबई 391, नागपूर 674, नांदेड 261, नंदूरबार 60, नाशिक 476, उस्मानाबाद 135, पालघर 222, परभणी 173, रत्नागिरी 100, रायगड 252, सांगली 245, सातारा 242, सोलापूर 355, ठाणे 664, वर्धा 138, वाशिम 110, यवतमाळ 208.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)