कृषि पंपांकरीता विद्युत जोडणी तात्काळ पूर्ण करा

आ. बाळासाहेब पाटील यांच्या महावितरणच्या अधिकाऱ्यांना सूचना

कराड  – महाराष्ट्रातील कृषि पंप धारकांच्या विद्युत जोडण्या सन 2015 पासून प्रलंबित होत्या. त्याकरीता राज्याचे उर्जामंत्री ना. चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला. त्याप्रमाणे त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. अनामत रकमा भरलेल्या कृषिपंपधारक ग्राहकांची राज्य शासनाने महावितरणमार्फत एचव्हीडीएस योजनेअंतर्गत मार्च 2018 पर्यंतची विज जोडणी तात्काळ पूर्ण कराव्यात अशा सूचना आ. बाळासाहेब पाटील यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना दिल्या.

कराड येथील शासकिय विश्रामगृहात आयोजित महावितरण अधिकऱ्यांच्या बैठकीत आ. बाळासाहेब पाटील बोलत होते.
प्रारंभी महावितरणचे उपकार्यकारी अभियंता नवाळे यांनी एचव्हीडीएस योजनेअंतर्गत प्रलंबित कामांची माहिती दिली. तसेच उपकार्यकारी अभियंता जाधव-सातारा यांनी मुख्यमंत्री सोलर कृषिपंप योजनेसंबंधी सविस्तर माहिती दिली. नवीन विद्युत पोल उभे करताना वाहनांना अडथळा येवू नये अशा प्रकारे त्यांची उंची राहिल याची खबरदारी घ्यावी, एचव्हीडीएस योजनेतील कामे अधिकृत ठेकेदारांकडूनच व निर्धारीत वेळेत, गुणवत्तेची कामे करून घ्यावी, त्याचबरोबर नवीन कृषि पंपांच्या मिटर रिडींगबाबत व यापूर्वी आकारलेल्या चुकीच्या बिलांची दुरूस्ती ताबडतोब करण्याबाबत, आणि कराड उत्तरमधील ऊस जळीत प्रकरणांची नुकसान भरपाई प्रकरणे तातडीने मार्गी लावण्यासंबंधी आमदार बाळासाहेब पाटील यांनी अधिकाऱ्यांना सुचना दिल्या.

या बैठकीस महावितरणचे उपकार्यकारी अधिकारी नवाळे-कराड, कुंभार-उंब्रज, जाधव-सातारा, तावरे-रहिमतपूर, घाटोळ-औंध, शाखा अभियंता शिंदे-तारगांव, ढगाले-नागठाणे, चव्हाण-अतित, बिराजदार-निनाम पाडळी, जाधव- ओगलेवाडी, आर. जी. तांबे, प्रताप चव्हाण उपस्थित होते.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.