परिपूर्ण’ कुटुंब! 

शाहीद कपूरला एका मुलीनंतर आता मुलगा झाला आहे. त्याचे आईवडीलही अभिनयाच्या क्षेत्रातील लोकप्रिय व्यक्ती आहेत. अशा मंडळींनाही शाहीदचे कुटुंब “परिपूर्ण’ झाले, असे वाटते आणि ते तसे बोलूनही दाखवतात, याचे वैषम्य वाटते. एक मुलगी आणि एक मुलगा म्हणजे “परिपूर्ण कुटुंब’ ही व्याख्या आपल्याकडे अजूनही रूढ आहे. दोन मुली असतील, तर कुटुंब परिपूर्ण होऊच शकणार नाही का? जिथे मुला-मुलीमध्ये भेदभाव केला जात नाही, तेच खऱ्या अर्थाने परिपूर्ण कुटुंब होय.

अभिनेता शाहीद कपूर याला नुकताच मुलगा झाला. मीशा नावाची दोन वर्षांची मुलगीही त्याला आहे. शाहीदला मुलगा झाल्यावर शाहीदची आई म्हणाली, की शाहीदचे कुटुंब आता “परिपूर्ण’ झाले आहे. शाहीदच्या मातोश्री नीलिमा अजीम या स्वतः अभिनेत्री आणि नृत्यांगना आहेत. पंकज कपूर हे त्याचे वडील. मुलाच्या जन्मानंतर कुटुंब “परिपूर्ण’ झाले, अशीच त्यांचीही प्रतिक्रिया होती. या प्रतिक्रियेचा अर्थ कसा घ्यायचा? म्हणजे, शाहीद कपूरला आधी एक मुलगी आहे. आता मुलगा झाला म्हणून कुटुंब “परिपूर्ण’ झाले का? शाहीदला दुसरी मुलगीच झाली असती, तर परिवार “अपूर्ण’ राहिले असते का? “परिपूर्ण कुटुंब’ किंवा “चौकोनी कुटुंब’ ही संकल्पना वस्तुतः आपल्या देशात जेव्हा कुटुंब नियोजनाचा प्रचार-प्रसार सुरू झाला, त्या काळात रुजली. “हम दो, हमारे दो’ असा नारा सरकारने दिला होता. दोन मुले झाली की कुटुंब परिपूर्ण झाल्याचे लोकांना वाटे. परिपूर्ण कुटुंबाची ही व्याख्या आपल्याकडे लोकप्रिय झाली; परंतु कुटुंब नियोजन लोकप्रिय होऊ शकले नाही. देशाची लोकसंख्या कमी होण्याऐवजी वाढतच राहिली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

आता एक अब्ज तीस कोटी एवढी भारताची लोकसंख्या आहे. अशा काळातही एक मुलगा आणि एक मुलगी असलेले परिवारच आपण “परिपूर्ण’ मानणार असू, तर ज्यांना दोन्ही मुले किंवा दोन्ही मुली आहेत, ती कुटुंबे “परिपूर्ण’ नाहीत, असे म्हणायचे का? दोन मुली असलेली कुटुंबे तर्‌ आपल्याकडे अक्षरशः न्यूनगंडाने पछाडलेली दिसतात, तर दोन मुले असलेली कुटुंबे दोन मुली असलेल्या कुटुंबांपेक्षा अजूनही स्वतःला श्रेष्ठ समजतात. ही कुठली मानसिकता?

ज्या घरात पहिली मुलगी झाली आहे, त्या घरात दुसऱ्या वेळी मुलगाच व्हावा, अशी इच्छा आजही व्यक्त केली जाते. नीलिमा अजीम आणि पंकज कपूर यांच्यासारख्यांचे हे उद्‌गार आपल्याकडे ही मानसिकता किती खोलवर रुजलेली आहे, हेच दर्शवितात. याच मानसिकतेचा एक भयावह परिणाम म्हणजे, पहिली मुलगी झाल्यानंतर दुसरे अपत्य जेव्हा जन्माला येणार असते, तेव्हा स्त्रीच्या पोटात वाढत असलेला गर्भ हा मुलाचा आहे की मुलीचा, हे जाणून घ्यावे अशी अनेकांना इच्छा होते. अनेकजण तसे जाणून घेतातही. याचा पुढचा टप्पा अर्थातच मुलीला गर्भातून नाहिसे करणे, हा असतो. गर्भलिंगचाचणी आणि स्त्रीभ्रूणहत्या या गोष्टी आपल्या देशातून अजूनही हद्दपार होऊ शकलेल्या नाहीत.

गर्भलिंगनिदान विरोधी कायदा अस्तित्वात असूनही हे प्रकार सर्रास घडत आहेत. गर्भलिंगचाचणी हा कायद्याने गुन्हा आहे, असा फलक प्रत्येक क्‍लिनिकमध्ये दर्शनी भागात लावलेला असतो; मात्र या फलकाच्या आड हे प्रकार सुरूच असतात आणि अनेकदा असे करताना लोक पकडलेही जातात. दुसऱ्या वेळीही मुलगी होणार आहे, हे कुटुंबीयांना समजताच गर्भपात करण्याचा प्रयत्न केला जातो. ज्या कुटुंबांमध्ये पहिला मुलगा होतो, त्या घरातल्या बायका उघडपणे असे म्हणताना दिसतात की, आता कसलाही तणाव उरला नाही. दुसऱ्या वेळी मुलगा होवो वा मुलगी, आता काही फरक पडत नाही!

परिपूर्ण कुटुंबा’चा नारा देण्यामागे त्याकाळी संबंधितांचा उदात्त हेतू होता. मुलगा आणि मुलगी यांना समानतेची वागणूक या निमित्ताने मिळेल, असे स्वप्न होते. मुलींनाही कुटुंबाचा एक महत्त्वाचा हिस्सा मानले जाईल. त्यांचे पालनपोषण, शिक्षण योग्य प्रकारे होईल. मुलाइतकाच खर्च मुलीवरही केला जाईल. आणि खरोखर ज्या घरांमध्ये मुलामुलींना समानतेची वागणूक मिळते, त्याच कुटुंबाला खऱ्या अर्थाने “परिपूर्ण कुटुंब’ म्हणता येईल. परंतु आपल्याकडे या घोषणेचा चुकीचा अर्थ घेतला गेला आणि नेमके उलटे घडत गेले. पहिली मुलगी झाल्यास आनंदोत्सव फारसा साजरा केला जात नाही. त्यात दुसऱ्यांदाही मुलगी झाली, तर समजावे तिच्या आईचे आता काही खरे नाही! सतत मुलींना जन्माला घालणाऱ्या महिलांना आजही आपल्याकडे टोचून बोलले जाते.

पूर्वीची जुनाट मानसिकता संपेल असे वाटत असतानाच आजही मुलगी झालेले पती-पत्नी चेहरा वाकडा करताना दिसतात. गुपचूप गर्भलिंगनिदान आणि भ्रूणहत्येच्या सोयी उपलब्ध झाल्यामुळे तर तंत्रज्ञान मुलींच्या मुळावर उठले आहे, असेच म्हणावे लागेल. मुलगा हवा असलेल्या दाम्पत्यांसाठी सर्वकाही किती सोपे झाले आहे या तंत्रज्ञानामुळे! दुसरी मुलगीच झाली, तर तिच्या हुंड्याचा खर्च कोण करणार? असा प्रश्‍न विचारणारे लोक आदर्शाच्या गोष्टी करणाऱ्यांना म्हणतात, “”उपदेशाचे डोस कुणीही पाजेल. खर्च कोण करणार?” म्हणजेच, मुलीच्या जन्माचे स्वागत व्हावेसे वाटत असेल, तर हुंड्यासारख्या अनिष्ट रूढी आपल्याला आधी हद्दपार कराव्या लागतील. परंतु दुर्दैवाने याबाबतही कायदा असताना आजही हुंडा दिला आणि घेतला जातो. मुलगा ही “इन्व्हेस्टमेन्ट’ ठरते आणि मुलगी “लाएबिलिटी’! कधी जाणार ही बुरसटलेली मानसिकता?

सर्वसामान्य कुटुंबातून मुलीच्या जन्माचे स्वागत न होणे एकवेळ समजून घेता येऊ शकेल. परंतु सधन आणि लोकप्रिय व्यक्तींनीही असाच सूर लावावा, हे आकलनाबाहेरचे आहे. नीलिमा अजीम यांच्यासारख्या व्यक्तीनेही “परिपूर्ण’ कुटुंबाची तीच कल्पना बाळगावी आणि पंकज कपूर यांच्यासारख्या चतुरस्त्र अभिनेत्यालाही त्याच सुरात सूर मिसळावासा वाटतो, हे अगम्य आहे. केवळ लिंगाच्या आधारे होणारा हा भेदभाव आपल्या समाजातून नष्ट होणार आहे की नाही? यापासून मुक्ती मिळणार आहे की नाही? असे प्रश्‍न सतावू लागतात. “परिपूर्ण कुटुंब’ म्हणजे एक मुलगा आणि एक मुलगी असा अर्थ घेणे पूर्णतः चुकीचे आहे. दोन मुली किंवा दोन मुले असलेले कुटुंबही “परिपूर्ण’ असू शकते. त्याहीपुढे जाऊन सांगायचे झाल्यास जिथे मुला-मुलीमध्ये भेदभाव केला जात नाही, तेच खरे “परिपूर्ण कुटुंब’ अशी व्याख्या आता रूढ व्हायलाच हवी.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)