उपमुख्यमंत्री पवार यांच्या सूचना; पुणे स्मार्ट सिटीबाबत ऑनलाइन बैठक
पुणे – पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेण्ट कॉर्पोरेशन लि. अंतर्गत असलेली नियोजित कामे गतीने, दर्जेदार, गुणवत्तापूर्ण, दृष्य स्वरूपात आणि विशेष म्हणजे वेळेत पूर्ण करा, असे आदेश उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत.
“पुणे स्मार्टसिटी डेव्हलपमेंट कोर्पोरेशन लिमिटेड’च्या “स्मार्टसिटी ऍडव्हायझरी फोरम’ची चौथी बैठक उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी आयोजित करण्यात आली होती.
मंत्रालयातील उपमुख्यमंत्र्यांच्या समिती सभागृहात आयोजित या बैठकीला पुण्यातून व्हिडिओ कॉन्फरन्सींगद्वारे महापौर मुरलीधर मोहोळ, खासदार गिरीश बापट, आमदार माधुरी मिसाळ, आमदार चेतन तुपे, आमदार सुनील टिंगरे, महापालिका आयुक्त विक्रम कुमार, पुणे स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संजय कोलते, महापालिकेच्या उपायुक्त रुबल अगरवाल यांच्यासह पदाधिकारी, अधिकारी आदी उपस्थित होते. यावेळी डॉ. कोलते यांनी स्मार्टसिटी अंतर्गत सुरू असणाऱ्या कामांचे सादरीकरण केले.
याशिवाय मागे पडलेली कामे आणि नियोजित कामे मुदतीत पूर्ण होतील याची दक्षता घ्या, त्यासाठी लोकप्रतिनिधींच्या सूचना विचारात घेऊन त्यानुसार अंमलबजावणी करा. हे करताना पुणे “स्मार्ट सिटी’चे रॅंकिंग राष्ट्रीय पातळीवर कसे सुधारेल यासाठीही आपला प्रयत्न असला पाहिजे, अशाही सूचना पवार यांनी दिल्या.
स्मार्ट सिटी प्रकल्पासाठी केंद्र सरकार, राज्य सरकार आणि महापालिकेच्या माध्यमातून मिळणाऱ्या निधीचे योग्य प्रकारे नियोजन करावे. स्मार्टसिटी अंतर्गत हाती घेण्यात आलेल्या सर्व प्रकल्पांची कामे दर्जेदार होण्याकडे लक्ष द्यावे. स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत सुरू करण्यात आलेली “कमांड कंट्रोल रुम’ अधिक चांगल्या प्रकारे कार्यान्वित करण्यासाठी विशेष लक्ष द्यावे, असेही पवार यांनी सांगितले.