मतदान यंत्रांवर पूर्ण ‘विश्‍वास’; मतपत्रिकांची गरज नाही – अजित पवार

मुंबई – इलेक्‍ट्रॉनिक मतदान यंत्रांवर आपल्याला पूर्ण विश्‍वास आहे. राज्य सरकारला निवडणूकीत कागदी मतपत्रिका नको आहेत, असे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे. पूर्वी भाजपचे विरोधी पक्ष असलेल्या कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षानेही “ईव्हीएम’बाबत शंका उपस्थित केल्या होत्या.

या मतदान यंत्रांद्वारे मतांची हेराफेरी केली जाऊ शकत असल्याचा संशयही व्यक्‍त केला होता. त्या पार्श्‍वभुमीवर पवार यांनी ही भूमिका स्पष्ट केली आहे. “ईव्हीएम’ चांगली काम करतात. मात्र निवडणूकीत पराभूत होणाऱ्यांकडूनच या मतदान यंत्रांवर टीका केली जात असते, असे पवार म्हणाले.

काही दिवसांपूर्वी कॉंग्रेस नेते नाना पटोले यांनीही विधानसभेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देण्यापूर्वी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आणि विधानसभेच्या निवडणूकीत मतदान यंत्रांबरोबरच मतपत्रिकांच्या वापराचा पर्याय देण्याबाबत कायदा करण्याची सूचना केली होती. मात्र प्रत्येक व्यक्‍तीला मत मांडण्याचा अधिकार आहे. पटोले यांनी त्यांचे मत मांडले. मात्र “ईव्हीएम’ बद्दल आपल्याला काय वाटते, ते आपण सांगितले असल्याचे ते म्हणाले.

“ईव्हीएम’ बाबत राज्य सरकारच्या भूमिकेबद्दल विचारले असता महाराष्ट्र विकास आघाडीला कागदी मतपत्रिकांची अजिबात गरज नाही, असे पवार यांनी ठामपणे सांगितले. कॉंग्रेसने 2018 मध्ये राजस्थानमध्ये आणि 2017 मध्ये राजस्थानात विजय मिळवून सरकार स्थापन केले आहे. या दोन्ही निवडणूकांमध्ये ‘ईव्हीएम’चा वापर झालेला होता.

निवडणूकीत विजय मिळाला तर सर्व काही ठीक असते. मात्र पराभव झाला तर आरोप करायला सुरुवात होते. “ईव्हीएम’मुळे काम पेपरलेस झाले आहे. आपल्याला स्वतःला ‘ईव्हीएम’वर पूर्ण भरवसा आहे, असे ते म्हणाले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.