चंदिगढ: कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर कार्यालयांमध्ये सोशल डिस्टन्स राखण्यासाठी सरकारने कर्मचार्यांना घरातून काम करण्याच्या सूचना दिल्या आहेत. पुरुष कर्मचार्यांसाठी काही अवघड नव्हतं. परंतु महिला कर्मचारी, विशेषत: विवाहित महिला कामगारांसाठी एक समस्या बनली.
एक हजाराहून अधिक महिला कामगारांनी वर्क फ्रॉम होम करताना पती आणि सासू त्रास देत असल्याचे म्हटले आहे. त्यांनी पंजाब राज्य महिला आयोगाकडे अशी तक्रार पाठविली आहे.
नवरा आणि सासूच्या या वृत्तीमुळे बहुतेक घरात घरगुती भांडणे वाढत आहेत. महिला आयोगाच्या अध्यक्षा मनीषा गुलाटी म्हणाल्या, महिला कामगारांनी सांगितले की, घरून काम करत असताना त्यांना ऑफिसमध्ये ऑनलाइन जोडले जावे लागते. आणि फाईल्सशी संबंधित काम सुरूच असते. मात्र सासूला वाटते सून घरी असून पण घरकाम करत नाही. येथूनच कुटुंबातील तणाव सुरू होतो आणि भांडणात रुपांतर होते.
मनीषा गुलाटी म्हणाले की, सासू आणि पती-पत्नी यांच्यात अशा प्रकारच्या संघर्षांच्या बहुतांश तक्रारी शहरी भागातून येत आहेत. आयोगाकडे आतापर्यंत 1000 हून अधिक तक्रारी लेखी प्राप्त झाल्या आहेत, तर व्हॉट्सअॅप व ई-मेलच्या जवळपास 800 तक्रारी पोहोचल्या आहेत.
तक्रारींचे निवारण करण्यासाठी आयोगाने ई-कोर्ट प्रणाली सुरू केली असून आयोग लवकरच अशा प्रकरणे निकाली काढण्याचा प्रयत्न करीत आहे. महिला कर्मचाऱ्यांच्या या तक्रारींबाबत त्यांनी मुख्यमंत्र्यांनाही कळविले असून त्यावर मुख्यमंत्र्यांनी डीजीपी यांना योग्य त्या सूचना देण्यास सांगितले आहे, असे मनीषा गुलाटी म्हणाल्या.