मोहन जोशींकडून तक्रारींचा पाऊस

निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात बापटांचा ठिय्या

पुणे – पुणे लोकसभा मतदारसंघातील मतदान मोजणीच्या गोंधळानंतर मतमोजणीवेळीही जिल्हा प्रशासनाचे नियोजन ढासळल्याचे दिसून आले. त्यामुळे पुणे लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी करताना एक फेरी होण्यासाठी तब्बल एक ते सव्वा तासांचा वेळ जात होता. तर या मोजणीवेळी ईव्हीएम बंद पडणे, मशिनची चार्जिंग, मशिन सील नसणे, मशिन तसेच नोंदींचे क्रमांक वेगळे असणे याबाबत कॉंग्रेसचे उमेदवार मोहन जोशी यांनी 10 ते 11 तक्रारी केल्या. त्यामुळे ही प्रक्रिया आणखी संथ झाली. तर संथ मतमोजणीच्या कामकाजावरून भाजपचे उमेदवार गिरीश बापट यांनीही निवडणूक निरीक्षकांकडे तीव्र शब्दांत नाराजी व्यक्‍त केली.

मतमोजणी सुरू झाल्यानंतर पहिल्या फेरीनंतरच कॉंग्रेसच्या मतमोजणी प्रतिनिधींकडून आक्षेप घेण्यास सुरूवात करण्यात आली. शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघाच्या काही मशीन सुरू होत नसल्याने तसेच मशीनच्या सील बाबत उमेदवारांच्या प्रतिनिधींनी शंका उपस्थित केल्याने काही काळ मतमोजणी थांबविण्यात आली. त्यामुळे पहिल्या फेरीचा निकाल साडेनऊनंतर आला. त्यानंतर कॉंग्रेस उमेदवार मोहन जोशी यांनी थेट मोजणी प्रक्रियेतील त्रुटींवर शंका उपस्थित करत अनके लेखी तक्रार केल्या. त्यात प्रामुख्याने पहिल्या फेरीची सर्व आकडेवारी अंतिम झाल्याशिवाय, कोणत्याही स्थितीत पुढील फेरीची मतमोजणी करू नये, अशी मागणी करण्यात आली. त्यामुळे पुण्याचे निवडणूक निर्णय अधिकारी जिल्हाधिकारी जोशी यांची मागणी मान्य करत पहिल्या फेरीची सर्व मतमोजणी पूर्ण झाल्यानंतरच दुसऱ्या फेरीची मतमोजणी हाती घेण्यात आली. त्यामुळे सायंकाळी चार वाजेपर्यंत अवघ्या 9 फेऱ्यांची मतमोजणी पूर्ण झाली होती. त्याचवेळी मोहन जोशी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयात बसूनच होते.

4 वाजण्याच्या सुमारास भाजपचे उमेदवार गिरीश बापट हेदेखील निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या भेटीला पोहचले. यावेळीच निवडणूक निरीक्षकही उपस्थित होते. त्यावेळी बापट यांनी पुण्याच्या मतमोजणीच्या संथ गतिबाबत थेट नाराजी व्यक्‍त केली. एका बाजूला पुणे जिल्ह्यातील तीनही मतदारसंघाची मतमोजणी पूर्ण होऊन उमेदवार आपल्या आपल्या गावी पोहचले असले, तरी पुण्याची मोजणी अशा प्रकारे उशिरा सुरू असण्याबाबत नाराजी व्यक्त केली. या वेळी निवडणूक निरीक्षकांकडून नियमानुसारच काम सुरू असून मतमोजणीस वेळ लागत असल्याबाबतची कबुली दिली.

मतमोजणीनंतर तक्रारींची छाननी
जोशी यांनी केलेल्या तक्रारी तसेच बंद पडलेल्या आणि आक्षेप घेण्यात आलेल्या ईव्हीएमची तपासणी तसेच त्या तक्रारींबाबतचा निर्णय मतमोजणीनंतर घेतला जाणार आहे. त्यामुळे पुणे शहराची मतमोजणी पूर्ण झाली, तरी बंद असलेल्या ईव्हीएमची व्हीव्हीपॅट मशिनच्या माध्यमातून मतमोजणी केली जाणार आहे. तर सर्व फेऱ्या संपल्यानंतर व्हीव्हीपॅटची मोजणी केली जाणार आहे. त्यामुळे पुण्याचा निकाल जाहीर होण्यास मध्यरात्र होण्याची शक्‍यता प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आली.

बापटांनी मांडला ठिय्या
निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची भेट घेऊन बापट मतमोजणी केंद्रातून बाहेर जाण्यासाठी निघाले. त्यानंतर ते माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधत असतानाच; मोहन जोशी यांनी पुन्हा तक्रार केल्याने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांसमोर गोंधळ झाला. ही माहिती कार्यकर्त्यांनी बापटांना दिली. त्यामुळे संतापलेल्या बापट यांनी पुन्हा आत जात निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या दालनातच ठिय्या मांडला, तसेच आता मतमोजणी पूर्ण झाल्यानंतरच विजयाचे प्रमाणपत्र घेऊनच येथून जाणार असल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे या ठिकाणी काही काळ गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)